गायत्री मंत्राचे विडंबन करणारे गुजराती अभिनेते रंधेरियासह ५ जणांच्या विरोधात नंदुरबार येथे तक्रार प्रविष्ट

  • हिंदूंनो, चित्रपट, नाटक, कथा, कादंबरी, वेब सिरीज यांच्या माध्यमातून हिंदु धर्म, देवता, संत यांचे होणारे विडंबन आणखी किती दिवस सहन करणार ?
  • अन्य धर्मियांच्या मंत्राचे अशा पद्धतीने विडंबन करण्याचे धाडस गुजराती अभिनेता दाखवणार का ?

नंदुरबार, २ डिसेंबर (वार्ता.) – गायत्री मंत्राचा मद्य प्राशनाशी संबंध दर्शवणारे चित्रण प्रदर्शित करून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी हिंदु सेवा समितीचे श्री. नरेंद्र पाटील यांनी नंदुरबार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. (जागृत होऊन तत्परतेने कृती करणार्‍या धर्माभिमानी नरेंद्र पाटील यांचे अभिनंदन ! – संपादक) यामुळे गज्जूभाईचे पात्र गाजवणारे गुजरातचे विनोदवीर सिद्धार्थ रंधेरियासह अन्य ५ जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की,

१. सिद्धार्थ रंधेरिया या गुजराती नायकाचा ‘गज्जूभाई नी गोलमाल’ हा विनोदी कार्यक्रम प्रसारित होत असतो. त्याचे काही भाग ‘यू ट्यूब’वरूनही प्रसारित होतात. त्यापैकी एका भागात नायिका डोळे बंद करून गायत्री मंत्राचा जप करतांना दाखवले आहे. त्याच वेळी नायक (सिद्धार्थ रंधेरिया) तिचे डोळे बंद असल्याची निश्‍चिती करत बाटलीतील मद्य तिच्या समोरील तांब्याच्या कलशात टाकतो. नायिकेच्या पाठोपाठ नायक ढेकर दिल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून विडंबन करतो. मंत्राविषयी अनेक विनोद करतो. नंतर ‘भू’ चा अर्थ ‘पाणी’ आणि ‘र्भुव: स्व:’ म्हणजे ‘मोटोडो घोटोडो’ म्हणजे ‘मोठे घोट घेणे’, असे मंत्रांचे चुकीचे अर्थ सांगतांनाचेही दृश्य त्यात आहे. वस्तूत: गायत्री मंत्र हा वेदमंत्र असून हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये तो म्हटला जातो.

२. कार्यक्रमातील नायक, नायिका, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते यांनी नियोजनपूर्वक कट रचून संगनमताने पूर्ण देशभर हिंदु धर्माची अपकीर्ती केली आहे. विडंबनाच्या माध्यमातून हिंदु धर्मियांच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या. हिंदु धर्माविषयी मनात द्वेषभावना बाळगून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसे प्रसारित केले.

३. हेतूपुरस्सर आणि दुष्ट उद्देशाने त्यांनी हे चित्रण केले आहे; म्हणून उपरोक्त सर्वांवर तात्काळ भारतीय दंड संहिता कलम १२० (ब), १५३ (अ), २९५(अ), २९८, ४९९, ५००, ५०४, ५०५ आणि ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करून कठोर शिक्षा करण्यात यावी.