पणजीत भरवस्तीत वेश्याव्यवसायासाठी थांबलेली महिला, ही अतिशय गंभीर गोष्ट ! – महिला विभाग, गोवा सुरक्षा मंच

पणजी – पणजीत भरवस्तीत वेश्याव्यवसायासाठी महिला ग्राहकाची वाट पहात उभी  रहाणे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंचच्या महिला विभागाने केले आहे.

याविषयी एका पत्रकार परिषदेत महिला मंचच्या अध्यक्षा सौ. रोशन सावंत म्हणाल्या, ‘‘२४ नोव्हेंबरला ‘गोवा जंक्शन’ हा ‘डिजिटल पोर्टल’ पाहिला आणि त्यातील महिला ग्राहकासाठी थांबलेली घटना अतिशय गंभीर असून गोव्यात दिवसाढवळ्या अशा गोष्टी घडणे, हा चिंतेचा विषय आहे. गोव्यात एरव्हीही राजरोस ‘मसाज पार्लर’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालतो; पण असे राजरोस प्रकार व्हायला लागले, तर ते समाजाच्या हिताचे नाही. अशा समाजघातकी गोष्टींवर सरकारने पोलीस खात्यामार्फत अंकुश ठेवायला हवा.

पणजीत अनेक सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आहेत अन् त्यात अनेक महिला कामाला असतात. त्या कामानिमित्त बाहेर पडतात. यांपैकी कुणी बसची वाट पहात, तर काही जणी त्यांचा भाऊ किंवा पती न्यायला येण्याची वाट पहात थांबतात. त्यांच्याकडे कुणी तशाच नजरेने पाहिले आणि एखादी घटना घडली, तर त्याला उत्तरदायी कोण ? एक अनैतिक गोष्ट आली की, त्यासह इतर अनैतिक गोष्टी येतात. गोव्यात कॅसिनो चालू झाले आणि जुगारासमवेत इतर अनैतिक गोष्टींना ऊत आला. कॅसिनोंमुळे जुगार, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय यांना जणू प्रमाणपत्रच मिळाले. याची झळ सामान्य जनतेला बसत आहे. १ नोव्हेंबरपासून कॅसिनो चालू झाले आणि पणजीचे चित्र पुन्हा पालटले. रस्त्यावर फिरणार्‍या, भडक दिसणार्‍या मुली, कॅसिनोत प्रवेश मिळवण्यासाठी उडालेली झुंबड, त्यामुळे चालू झालेले अनैतिक व्यवसाय यांमुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होत आहे.

गोवा सुरक्षा मंचचे गोवा सरकारला आवाहन आहे की, कॅसिनो, वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थ यांमुळे होणारी गोव्याची अपकीर्ती रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत. सर्वसामान्य जनतेच्या आणि विशेषतः महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सक्रीय करावी.’’