एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांत एकादशीचे व्रत केले जाते. सदर लेखातून कार्तिकी एकादशी हे व्रत करण्याची पद्धत, या दिवशी श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र का वहावे इत्यादी माहिती जाणून घेऊया.
१. देवता
एकादशी या व्रताची देवता श्रीविष्णु आहे.
२. कार्तिकी एकादशी हे व्रत करण्याची पद्धत
एकादशीला काहीएक न खाता केवळ पाणी आणि सुंठसाखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला उपवास करून दुसर्या दिवशी पारणे करतात.
३. कार्तिकी एकादशीला श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र वहावे
या रात्री श्रीविष्णूला बेल वहातात आणि शिवाला तुळशीपत्र वहातात. याला ‘हरिहर-भेट’ किंवा ‘हरिहर-अद्वैत’ म्हणतात.
४. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा उल्लंघून (ओलांडून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत !
कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वहाता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे (अध्यात्मशास्त्रीय कारण) म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वहाता येतो.
ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्या भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून (स्वसंप्रदायाच्या सीमा उल्लंघून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे; कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.’
– डॉ. चारुदत्त पिंगळे (आताचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.)
५. एकादशी व्रताचे महत्त्व
अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.
अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।
एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।
– पद्मपुराण
अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६.२५ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.
आ. एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्या विष्णुतत्त्वामुळे वायूमंडल विष्णुतत्त्वयुक्त लहरींनी भारित असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्त्वाच्या लहरी अधिक प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान)
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘उत्सव आणि व्रते साजरे करण्यामागील शास्त्र’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |