मुरगाव पोर्ट ट्रस्ट बंदरात कोळसा हाताळणार्‍या १९ आस्थापनांना ‘सेस’ भरण्याविषयी गोवा सरकारची नोटीस

एकूण २०८ कोटी रुपयांचा ‘सेस’ थकित

पणजी – मुरगाव पोर्ट ट्रस्ट बंदरात कोळसा हाताळणार्‍या १९ आस्थापनांनी एकूण २०८ कोटी रुपयांचा ‘सेस’ (कर) गोवा सरकारला देणे शेष आहे. या सर्व आस्थापनांना सेस भरण्याविषयी गोवा सरकारने नोटीस जारी केली आहे. कोळशाची वाहतूक करणार्‍यांकडून हा सेस गोवा ग्रामीण विकास आणि कल्याण सेस या नावाने वसूल केला जातो. वर्ष २०१४ पासून जुलै २०१८ पर्यंतचा सेस या आस्थापनांनी भरणे शेष आहे. ९ नोव्हेंबरला ही नोटीस जारी केली असून यात साहाय्यक वाहतूक संचालकांनी या आस्थापनांना १५ दिवसांच्या आत सेस भरण्यास सांगितले आहे.

सर्वांत अधिक म्हणजे १५६ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी जेएस्डब्ल्यू स्टील यांच्याकडे असून त्या खालोखाल १२ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी जेएस्डब्ल्यू एनर्जी यांच्याकडे आहे. ही दोन्ही आस्थापने जिंदाल ग्रूपची आहेत. ११ कोटी ६८ लाखांची थकबाकी सेझाकडे, तर बीएम्एम् इस्पात यांच्याकडे १० कोटी ४८ लाख, अदानी यांच्याकडे ७ कोटी १५ लाख आणि वेदांता यांच्याकडे ३ कोटी १ लाख रुपयांची थकबाकी आहे. या कालावधीत ४ कोटी २९ लाख १० सहस्र मेट्रीक टन कोळशाची वाहतूक करण्यात आली. एकूण सेसपैकी केवळ ६ कोटी रुपयांचा सेस सर्वांनी मिळून गोवा सरकारकडे आतापर्यंत भरला आहे.