पणजी – कोरोना महामारीमुळे गेले कित्येक मास घरी बसून काढावे लागल्याने लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. या कालावधीत मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येत ७० टक्के वाढ झाली असल्याची माहिती गोवा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुषमा मांद्रेकर यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या,
१. ‘‘राज्य बाल हक्क आयोगाकडे येणार्या तक्रारी आणि समुपदेशनासाठी येणारे दूरध्वनी ५ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी असतात.
२. लहान मुलांसाठी शाळा म्हणजे केवळ शिक्षण घेण्याचे ठिकाण नसते. शाळेत मुले त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटतात. तिथे त्यांचा आवडत्या नावडत्या गोष्टींविषयी संवाद होतो, तसेच खेळणे बागडणे होते. आजूबाजूचा परिसर त्यांना अनुभवता येतो.
३. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांचे जग आणि भावविश्व एका अर्थाने ठप्प झाले आहे. याचा मुलांच्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम होत असून मुलांमध्ये अबोलपणा, एकटेपणा आणि चिडचीड वाढत असल्याचे दिसून आले आहे.
४. भ्रमणभाषच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण अनेक मुलांना समजत नाही आणि या गोष्टीचाही काही मुलांना ताण येतो.
५. मुले शाळेत जात नसल्याने मुलांचे पालक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याचा पालकांनी अभ्यास करायला हवा. त्याच्यासाठी जर मानसोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, तर त्यांनी बाल हक्क आयोगाशी संपर्क साधून साहाय्य घ्यावे.
६. मुलांना सृजनात्मक कला आणि खेळ यांमध्ये व्यस्त ठेवावे. त्यांच्याशी सकारात्मक गोष्टींवर गप्पा कराव्यात.
७. अनाथाश्रमात रहाणार्या लहान मुलांचे पुष्कळ हाल झाले आहेत. ही मुले एरव्ही कुणाकडे हट्ट करू शकत नाहीत. ते त्यांचे विचार त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे व्यक्त करतात. आता बोलणेच बंद झाल्याने या मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे.’’