मुसलमानविरोधी भावना वाढेल; म्हणून २६/११ च्या आक्रमणानंतर काँग्रेस सरकारने पाकवर आक्रमण केले नाही ! – बराक ओबामा यांचा गौप्यस्फोट

  • काँग्रेसचा खरा चेहरा अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी उघड केला हे बरे झाले ! गेली अनेक दशके भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना हेच सांगत आहेत; मात्र त्यावर तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी विश्‍वास ठेवण्यास सिद्ध नाहीत. आतातरी ते यावर विश्‍वास ठेवून काँग्रेसला जाब विचारतील अशी अपेक्षा !
  • काँग्रेस हा देशाला मिळालेला शाप आहे, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये, इतकी हानी काँग्रेसमुळे या देशाची स्वातंत्र्यानंतरच नव्हे, तर स्वातंत्र्यपूर्वी गांधी यांचा उदय झाल्यापासून झाली आहे !
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

वॉशिंग्टन (अमेरिका) – २६/११ च्या मुंबईवरील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे पाकवर आक्रमण करण्यास टाळाटाळ करत होते. याच्यामुळे त्यांची राजकीय हानी झाली. डॉ. मनमोहन सिंह यांना देशात मुसलमानविरोधी भावना वाढेल, अशी चिंता होती. यामुळे भाजपची शक्ती वाढत आहे; म्हणूनच डॉ. मनमोहन सिंह यांनी पाकच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या आत्मचरित्रामध्ये केला आहे.

पाक सैन्यातील काहींचे तालिबान आणि अल् कायदा यांच्याशी संबंध होते !  

लादेनला ठार मारण्यासाठी पाकच्या सैन्याचे सहकार्य घेतले नाही !

अमेरिकेला हे ठाऊक होते, तरी अमेरिकेने अनेक वर्षे पाकला आर्थिक आणि सैनिकी साहाय्य केले, याविषयी ओबामा यांनी का सांगितलेले नाही ? ही चूक ते का स्वीकारत नाही ? अमेरिकेने राजकीय स्वार्थासाठी पाकला साहाय्य केल्याचा परिणाम भारताला भोगावा लागला आहे, याविषयी ओबामा आणि अमेरिका भारताची क्षमा मागणार आहे का ?

ओसामा बिन लादेन याला ठार करण्याच्या कारवाईत पाकिस्तान सरकारने आम्हाला सहकार्य केले होते. अफगाणिस्तानमध्येही अमेरिकी सैन्याला आवश्यक गोष्टी पोचवण्यासाठी साहाय्य केले; मात्र पाक सैन्य आणि विशेषत: गुप्तचर संस्थांमधील काहींचे तालिबान अन् अल् कायदा यांच्याशी संबंध होते. त्यामुळे या कारवाईत त्यांना सहभागी करून घेतले नाही, असा खुलासाही बराक ओबामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केला आहे. ‘अफगाणिस्तान सरकार हे कमजोर रहावे आणि अफगाणिस्तान भारताच्या आणखी जवळ जाऊ नये, यासाठीदेखील ही मंडळी कार्यरत होते’, असेही ओबामा यांनी म्हटले आहे.

लादेन याला ठार करण्याला जो बायडेन यांचा विरोध होता !

वर्ष २०११ आतंकवादी ओसामा बिन लादेन याला पाकमध्ये घुसून ठार मारण्याच्या मोहिमेला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्राध्यक्ष असणारे जो बायडेन आणि तत्कालीन संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी विरोध केला होता. लादेन याला ठार करण्यासाठी अनेक पर्यायांवर विचार करण्यात आला. या मोहिमेची गोपनीयता बाळगण्याचे मोठे आव्हान समोर होते, असे ओबामा यांनी या आत्मचरित्रात म्हटले आहे.

आय.एस्.आय. अल् कायदा आणि तालिबान यांचा भारत अन् अफगाणिस्तान यांच्या विरोधात वापर करते !

पाकिस्तानी सैन्याला अल् कायदा, तालिबान आणि इतर आतंकवादी संघटनांचे साहाय्य आहे, हे उघड रहस्य आहे. हे सर्व किती धोकादायक ठरू शकते, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे अल् कायदा आणि तालिबान यांच्याशी थेट अन् घनिष्ट संबंध आहेत. आय.एस्.आय. या आतंकवादी संघटनांचा भारत आणि अफगाणिस्तान यांच्या विरोधात वापर करत आहे, असेही ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.

भारतात लाखो लोक बेघर असतांना उद्योगपती राजेशाही थाटात जगत आहेत !

भारतात लाखो लोक आजही अतिशय वाईट अवस्थेत रहात आहेत. दुष्काळग्रस्त गावांमध्ये लोक झोपड्यांमध्ये काटकसर करत जीवन जगत आहेत; पण त्याच वेळी भारतीय उद्योग क्षेत्रातील रथीमहारथी हे राजेमहाराज आणि मोगल यांनाही लाजवतील, अशा थाटात जगत आहेत, असेही त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. वर्ष २०१५ मध्ये बराक ओबामा भारत दौर्‍यावर आले होते. तेव्हा ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते. या वेळी ओबामा यांना भेटण्यासाठी भारतातील उद्योगपतींची रांग लागली होती. या रांगेत रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचाही समावेश होता. उद्योगपती ओबामांना भेटण्यासाठी रांगेत उभे असल्याचे एक छायाचित्रदेखील त्या वेळी प्रसारित झाले होते.

आधुनिक भारत म्हणजे यशस्वी कथा !

राजकीय पक्षांमधील कटू संघर्ष, अनेक विभाजनवादी सशस्त्र चळवळी आणि भ्रष्टाचाराचे नवनवे घोटाळे घडूनही आधुनिक भारत ही यशस्वी कथा आहे, असे म्हणावे लागेल. वर्ष १९९० मधील अर्थपालटांमुळे भारताचेही बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाले. यामुळे भारतियांची अतुलनीय औद्योगिक कौशल्ये समोर आली. यामुळेच तंत्रज्ञान क्षेत्रे बहरली आणि मध्यमवर्ग विस्तारला. अनेक दृष्टीने आधुनिक भारत ही यशस्वी कथा आहे, असे ओबामा यांनी या आत्मचरित्रात म्हटले आहे. ओबामा यांनी या अर्थबदलांचे शिल्पकार म्हणून डॉ. मनमोहन सिंह यांचा गौरव केला आहे.