श्रीरामजन्मभूमीचा अंतिम निकाल – ‘मार्क्सवादी (साम्यवादी) दंतकथेचे काळे ढग’ भेदणारा युक्तीवाद !
राजधानी देहलीतील ‘भारत मंडपम्’ची भूमी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली आहे. याच ठिकाणाहून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा जयघोष केवळ देशातच नव्हे, तर जगभर निनादत आहे. धर्मजागृतीच्या या भव्य व्यासपिठावरून ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी एका अत्यंत विशेष आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाशी संवाद साधला, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू ! अधिवक्ता श्रीधर पोतराजू हे केवळ व्यवसायाने विधीज्ञ नाहीत, तर राष्ट्र-धर्म कार्यात समर्पित असलेले निष्ठावान सेवकही आहेत. त्यांचे आणि अधिवक्ता अनिरुद्ध शर्मा यांचे संयुक्त पुस्तक ‘केस फॉर राम : द अनटोल्ड इनसाईडर्स स्टोरी’ सध्या साहित्य आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. हे पुस्तक श्रीरामजन्मभूमीच्या अखंड न्याययुद्धाचा सजीव इतिहास आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनेक महापुरुषांनी दिलेले अमूल्य योगदान आणि श्रीरामजन्मभूमी प्रकरणातील अनेक अदृश्य अन् महत्त्वपूर्ण सत्ये उलगडण्यात आली.

अधिवक्ता पोतराजू यांच्यासारख्या धर्मनिष्ठ, बुद्धीमान आणि समर्पित विभूतींच्या अखंड प्रयत्नांचेच हे फलित आहे की, आज कोट्यवधी भारतियांचे श्रद्धास्थान असलेले भव्य श्रीराममंदिर अयोध्येत उभे राहिले आहे. या पुस्तकाच्या आणि श्रीरामजन्मभूमी संघर्षाच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिवक्ता पोतराजू यांनी सांगितलेली ‘न्यायमंदिराची सत्यकथा’ या लेखातून वाचकांसाठी पुढे देत आहोत.

१. श्रीरामजन्मभूमीचा निर्णय हा सनातन संस्कृतीसाठीचा सुवर्णक्षण !
वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांना पुस्तकाची प्रेरणा आणि महत्त्व स्पष्ट करतांना ‘श्रीरामजन्मभूमीचा निर्णय हा सनातन संस्कृतीसाठीचा सुवर्णक्षण आहे’, असे नमूद केले. हे पुस्तक सिद्ध होण्यासाठी जवळपास ५ वर्षे लागली; कारण हे केवळ कोणतेही पुस्तक नाही, तर हे तथ्याधारित संशोधन आहे. सर्वोच्च न्यायालयात श्रीरामजन्मभूमी खटला सलग ४० दिवस चालला होता. त्या अभूतपूर्व न्यायालयीन लढाईतील सिद्धता, युक्तीवादाची व्यूहरचना, तसेच वादविवाद या सगळ्यांचा धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे. श्रीरामजन्मभूमीचा निर्णय हा केवळ एका जागेचा निर्णय नव्हता, तर सनातनच्या अस्मितेचे पुनरुत्थान होते. जगातील कोणत्याही संस्कृतीने, मग ती इजिप्शियन असो वा रोमन, इतके अविरत प्रहार सहन केले नाहीत; मात्र सनातन धर्माने सहस्रो वर्षांच्या आक्रमणांचा धैर्यपूर्वक प्रतिरोध करत स्वतःला वाचवले. आम्ही ही लढाई पाश्चात्त्य न्यायप्रणालीच्या चौकटीत लढलो. पाश्चात्त्य न्यायप्रणालीच्या चौकटीत पुरावे सादर करून आम्ही त्यांच्याच नियमदंडात त्यांना हरवले. यामुळे केवळ श्रीराममंदिर उभे राहिले नाही, तर नागरिकांचा राज्यघटनात्मक उपायांवरील विश्वास पुनरुज्जीवित झाला.

२. आम्ही धर्माची लक्ष्मणरेषा कधीही ओलांडली नाही !
प्रभु श्रीरामचंद्रांसाठी लढलेल्या या कायदेशीर धर्मयुद्धात नैतिक मूल्यांचे पालन किती महत्त्वाचे होते, यावर वरिष्ठ अधिवक्ता पोतराजू यांनी अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण केले. ते म्हणाले, ‘‘आपण वाल्मीकि रामायण ऐकतो किंवा वाचतो; पण कलियुगात श्रीराम पुन्हा त्यांच्या जन्मभूमीत कसे परतले, हे सांगणे आमचे दायित्व होते. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे ज्येष्ठ विधीज्ञ के. परासरन् यांची स्पष्ट आज्ञा होती, ‘कोणतीही अशी पद्धत वापरू नका, जी प्रभु श्रीरामचंद्रांना मान्य नसेल.’ वादविवादात न्यायालयाचे वातावरण कितीही तापले, तरी आम्ही धर्माची लक्ष्मणरेषा कधीही ओलांडली नाही. प्रभु श्रीरामचंद्रांनी धर्माचे आचरण करूनच त्यांची जागा प्राप्त केली. हे पुस्तक वाचकांना थेट त्या न्यायमंदिर कक्षेत घेऊन जाते, जिथे रामलल्ला (श्रीरामाचे छोटे बालक रूप) विराजमान आहे ! निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांसारखे अनेक पक्षकार विविध पुराव्यांच्या बळावर केवळ स्वतःची दावेदारी सिद्ध करत होते.
प्रभु श्रीरामजी की ‘काेर्ट केस’ कैसे जीती गई ? | Adv. Sridhar Potraju #CaseForRam |
३. मार्क्सवादी दंतकथेचे कृष्णमेघ !
वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी सांगितले की, या प्रकरणातील सर्वांत मोठे आणि अदृश्य आव्हान होते, ते म्हणजे मार्क्सवादी विचारसरणीचे ‘गहनचक्र’ (डीप स्टेट) ! या अदृश्य शक्तीने इतिहासाचा सातत्याने उपहास करत त्याला केवळ पौराणिक कथा ठरवले. या खटल्यातून हे सिद्ध झाले की, त्यांनी इतिहास पालटला नाही, तर मार्क्सवादी दंतकथेला भारतीय इतिहास म्हणून खपवले. त्यांची साधने आजच्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या (व्हॉट्सॲपद्वारे पसरवलेली खोटी माहिती) तत्त्वांनुसार चालतात, म्हणजेच जे सत्यासमोर टिकणार नाही, त्याचाच ते प्रचार करतात ! अलाहाबाद उच्च न्यायालयाने वर्ष २०१० मध्येच या अनैतिक विचारसरणीच्या इतिहासकारांविरुद्ध कठोर निरीक्षणे नोंदवली होती. जे लोक स्वतःच्या नैतिक मूल्यांना फाटा देऊन केवळ विचारसरणीला महत्त्व देतात, त्यांना योग्य-अयोग्य याची कल्पना नसते. त्यांनी पसरवलेल्या खोटेपणाच्या काळ्या ढगांमध्ये (Black Clouds of Lies) आम्ही सत्याचा चमकदार दिवा लावला आहे. हाच दिवा पुस्तकाच्या रूपाने देशापुढे आज उभा आहे.

४. डाव्या (साम्यवादी) कथानकाला निष्प्रभ करणारे सत्य पुस्तकरूपाने जनमानसात !
वर्ष २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मुख्य प्रवाहातील डाव्या विचारसरणीचे कथानक पूर्णपणे निष्प्रभ केले आहे. हेच सत्य जनमानसात आणण्याचे प्रशंसनीय कार्य ‘केस फॉर राम : द अनटोल्ड इनसाईडर्स स्टोरी’ हे पुस्तक करत आहे. हे बहुमोल पुस्तक ‘रूपा पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केले आहे. ते ॲमेझॉन, तसेच देशातील प्रमुख पुस्तक विक्रीच्या दालनांमध्ये उपलब्ध आहे. हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्ये याचे भाषांतर करण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे, म्हणजे हा इतिहास घराघरांत पोचेल.
५. लढण्याची प्रेरणा !
वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांच्यासारख्या धर्मनिष्ठ, प्रज्ञावंत आणि समर्पित राष्ट्रभक्तांच्या अखंड तपश्चर्येचेच हे फलित आहे की, आज कोट्यवधी हिंदूंचे आराध्य प्रभु श्रीराम त्यांच्या जन्मभूमीत ५ शतकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सन्मानाने विराजमान झाले आहेत. ‘केस फॉर राम : द अनटोल्ड इनसाईडर्स स्टोरी’ हे पुस्तक केवळ श्रीरामजन्मभूमीच्या कायदेशीर विजयाची गाथा नाही, तर तो परकियांनी लादलेल्या बौद्धिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून ‘सुसंस्कृत न्याय’ मिळवण्याचा एक जाज्वल्य मार्गदर्शक आहे. हा लढा केवळ एका भूखंडासाठी नसून तो सनातनी अस्मितेचे पुनरुत्थान आणि दशदिशांना व्यापणार्या ‘बौद्धिक क्षात्रतेजा’चा आविष्कार आहे, हे पोतराजू यांनी जगाला दाखवून दिले आहे. अशाच निष्ठावान धर्माभिमानी हिंदूंचा त्याग, बुद्धी आणि सामर्थ्य यांच्या बळावर देहलीच्या ‘भारत मंडपम्’च्या भूमीवरून वैश्विक कल्याणासाठी कटीबद्ध असलेल्या सनातन राष्ट्राच्या पायाभरणीचा संकल्प दृढ झाला आहे. प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि अशा समर्पित साधकांच्या प्रयत्नांनी वैभवाप्रत पोचणारे हे ‘सनातन राष्ट्र’ लवकरच साकार होईल, हाच विश्वास आज प्रत्येक सनातनी हृदयात जागृत होत आहे.
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !