अधिवक्ता श्रीधर पोतराजू हे भाग्यनगर (तेलंगाणा) येथील उस्मानिया विद्यापिठाच्या वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांनी वर्ष १९९७ मध्ये देहली विद्यापिठाच्या कायदेविषयक विद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. सध्या ते देहली सर्वाेच्च न्यायालयात ‘वरिष्ठ अधिवक्ता’ म्हणून कार्यरत आहेत, तसेच त्यांनी पुष्कळ महत्त्वाची पदे भूषवली आहेत. वर्ष २००६ पासून ते सर्वाेच्च न्यायालयात ‘ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड’ (नोंदणीकृत अधिवक्ता) या पदावर कार्यरत आहेत, तसेच वर्ष २०२४ पासून ते सर्वाेच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता या पदावर कार्यरत आहेत. ते ‘देहली बार कौन्सिल’ आणि ‘सर्वाेच्च न्यायालय बार असोसिएशन’ यांचे सदस्य आहेत. या क्षेत्रात कार्य करत असतांना त्यांनी कित्येक नामांकित कायदा आस्थापनांमध्ये कार्य केलेले आहे. ते स्वतः स्वतंत्रपणे वकिलीचा व्यवसाय करत असून सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयांत घटनात्मक, व्यापारविषयक, पर्यावरणाशी संबंधित अन् करविषयक कायदे यांसारख्या कित्येक महत्त्वाच्या याचिकांमध्ये त्यांचा समावेश असतो.
अयोध्येतील ‘रामलल्ला विराजमान’ या बहुचर्चित खटल्यात ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कार्य केले आहे. ५०० वर्षे जुन्या रामजन्मभूमी वादाची कायदेशीर प्रक्रिया अनेक वर्षे चालू होती. या सुनावणीच्या वेळी जुनी न्यायालयीन कागदपत्रे शोधून काढणे आणि कायदा, तसेच प्राचीन धर्मग्रंथ यांमध्ये संशोधन करून संदर्भ शोधून काढणे, अशा स्वरूपाचे कार्य त्यांनी केले आहे. या कार्याविषयी आपण त्यांच्या शब्दांत जाणून घेऊ.
विशेष लेख

१. प्राचीन भारतीय ज्ञानव्यवस्थेच्या क्षेत्रात अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी दिलेले योगदान
अ. अधिवक्ता पोतराजू यांनी प्राचीन भारतीय ज्ञानव्यवस्थेतील ज्ञानसूत्रांना आधुनिक कायदेप्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मॅक्सिम्स् फ्रॉम महाभारत (महाभारतातील नीतीवचने)’ या त्यांच्या ग्रंथात त्यांनी भारताच्या प्राचीन आणि लोकप्रिय ‘महाभारत’ या महाकाव्यातील आचारसूत्रांचा (तत्त्वांचा) आधुनिक कायदेप्रणालीशी असलेला संबंध दाखवला आहे. या ग्रंथात त्यांनी ‘धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सांस्कृतिक वारशाचा आत्मा आहे’, असे म्हटले आहे. ‘भारताची ‘सुसंस्कृत’ ही ओळख नैतिक आणि मूल्याधिष्ठित अशा धर्माच्या पायावर आधारित आहे. हे मूलभूत तत्त्वज्ञान भारताच्या कायदेप्रणालीत अंतर्भूत केले पाहिजे’, असे त्यांना वाटते.
‘मॅक्सिम्स् फ्रॉम महाभारत (महाभारतातील नीतीवचने)’ |
आ. अधिवक्ता पोतराजू यांना ‘आयआयटी देहली’, गुजरात विद्यापीठ आणि शास्त्र विद्यापीठ यांनी ‘प्राचीन भारतीय ज्ञानव्यवस्था’ याविषयी आयोजित चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.
इ. भारतीय कायदेप्रणालीतील ऐतिहासिक महत्त्वाच्या निकालांचे त्यांनी जतन केले आहे. यासाठी त्यांनी ‘वादप्रतिवाद (Vadaprativada.in)’ या नावाचे एक संकेतस्थळ चालू केले असून त्याच्या माध्यमातून त्यांनी श्रीरामजन्मभूमीसारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या निकालांचे संगणकीकरण केले आहे. त्यामुळे संशोधकांना माहितीचा एक स्रोत प्राप्त झाला आहे. ‘भारतीय कायदेप्रणालीच्या समृद्ध वारशाची ओळख जगभरातील संशोधक आणि जिज्ञासू यांना व्हावी’, हा या संकेतस्थळाचा प्रमुख उद्देश आहे.
ई. सनातन धर्मातील मूल्ये, प्राचीन परंपरांचे ज्ञान यांची सांगड आधुनिक कायद्यांशी घातली जावी, यादृष्टीने ते प्रयत्नशील असतात. समकालीन न्यायशास्त्राला पारंपरिक ज्ञानाशी जोडण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, तसेच आधुनिक भारतातील कायदा आणि शिक्षण यांमध्ये देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यांसाठीही ते प्रयत्नशील आहेत.

२. विशेष कौशल्ये
अधिवक्ता पोतराजू हे गेली २५ वर्षे अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प, निविदा प्रकरणे, अभियांत्रिकी आणि ‘स्थापत्यशास्त्र कायदा १९९६’ यातील लवाद, घटनात्मक प्रावधाने, खाणकामाविषयीचे कायदे, पर्यावरण कायदे, बौद्धिक संपदा हक्क अधिकार, शुल्कविषयक कायदे यांत काम केले आहे. ते माहिती-तंत्रज्ञान आस्थापनांचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्य करतात. यासमवेत विविध संस्था, सार्वजनिक विभाग, व्यावसायिक संस्था, व्यक्ती, कायदेविषयक संस्था, शासकीय आणि अशासकीय संस्था यांचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत.

३. ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन यांच्या सहवासाने प्राचीन भारतीय ज्ञानगंगा आधुनिक कायदे प्रणालीत आणण्यासाठी प्रयत्नशील होणे
माझा जन्म भाग्यनगर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, जेथे धर्म आणि अध्यात्म हे आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते. लहानपणापासूनच आमच्या मनावर योग्य आणि अयोग्य यांविषयीचे संस्कार करण्यात आले. ‘वाईट कर्माच्या भीतीने योग्य वागण्यापेक्षा योग्य वागणे हाच सर्वाेत्तम पर्याय’, अशी आम्हाला शिकवण देण्यात आली आहे. हेच संस्कार घेऊन मी माझा वकिलीचा व्यवसाय चालू केला. आरंभीच्या काळात ‘अनैतिक गोष्टी केल्याविना या व्यवसायात यश मिळणार नाही’, असे मला वाटत असे. कालांतराने ‘कायद्यासारख्या व्यवसायात असूनही कित्येक व्यावसायिक धार्मिक आचरण सोडत नाहीत’, असे माझ्या लक्षात आले. असे प्रथितयश अधिवक्ते जी उत्तम माणसे आहेत, त्यांच्या समवेत कार्य केल्याने माझा प्रवास सुखकर झाला.

वर्ष २०१८ मध्ये मला या व्यवसायात येऊन २० वर्षे पूर्ण झाली आणि माझ्या मनात ‘मी अजून काय करू शकतो ?’ असे विचार येऊ लागले. ही एक हळूहळू होणारी उत्क्रांती होती. ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन यांच्या २० वर्षांच्या सहवासाने मला सनातन धर्म, रामायण, महाभारत यांच्याविषयी पुष्कळ नवीन दृष्टीकोन मिळाले. लहानपणापासून मला रामायण आणि महाभारत वाचण्याची सवय होती; मात्र याविषयी अधिवक्ता के. परासरन यांच्याशी विचारविनिमय केल्यावर मला त्यांचा नवा अर्थ उमगला. अधिवक्ता के. परासरन हे प्राचीन भारतीय मूल्ये आणि ऐतिहासिक संकल्पना यांची सांगड भारताच्या राज्यघटनेशी घालत असत. आक्रमणकर्ता, वसाहतवादी आणि राजकीय पक्षांच्या प्रभावामुळे आपल्यापैकी बहुतांश लोक पाश्चात्त्यांचे बौद्धिक गुलाम झाले आहेत. त्यामुळे सांस्कृतिक पाया डळमळीत झाला आहे. प्राचीन भारतीय ज्ञान आणि इंग्रजांच्या प्रभावाखाली असलेली आपली कायदेप्रणाली यांच्यात समन्वय करण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. मी प्राचीन भारतीय ज्ञानगंगा आधुनिक कायदे प्रणालीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हे करतांना मी स्वतःला केवळ एक माध्यम समजतो.
४. ‘वाल्मीकि रामायण’, ‘महाभारत’ आणि इतिहास यांच्या वाचनामुळे विविध आव्हानांना सामोरे जाता येणे
सनातन धर्म ही एक जीवनशैली आहे, जी आपल्याला स्वत:शी, इतरांशी आणि निसर्गाशी सुसंगतपणे जीवश कसे जगायचे ?, हे शिकवते. ही शिकवण जाणून घेण्याचा सर्वांत सोपा मार्ग, म्हणजे ‘वाल्मीकि रामायण’ आणि महर्षि व्यास यांचे ‘महाभारत’ यांचे वाचन करणे होय. या ग्रंथांच्या वाचनामुळे दैनंदिन जीवनातील समस्या आणि त्यांवर धर्मावर आधारित तोडगे यांविषयी ज्ञान होते. इतिहासाच्या वाचनामुळे देश आणि जग यांची ओळख होईल. अशा प्रकारे ज्ञान मिळवणार्या कोणत्याही व्यक्तीला पालटत्या काळाची आव्हाने लक्षात येतील आणि तो अपप्रचार अन् खोटी कथानके यांमध्ये न अडकता जागरूक राहील. पर्यायाने तो एक दायित्व असलेला भारतीय नागरिक बनेल.

५. ‘ईश्वर सर्वांमध्ये आहे’, हे सनातन धर्माचे तत्त्वज्ञान जाणून धर्म आणि अधर्म या एकाच मापदंडाने जगाकडे पहाणे आवश्यक !
आपण आपली संस्कृती, सभ्यता आणि वारसा यांचा वस्तूनिष्ठ अभ्यास करायला हवा. काही लोकांच्या मनात भारतीय गोष्टींविषयी द्वेष का आहे, याची कारणे समजून घेण्यासाठी शिकणे महत्त्वाचे आहे. आपल्याविषयीचा द्वेष काहींच्या स्वतःच्या श्रद्धास्थानांतून निर्माण झाला आहे. स्वतःची धार्मिक मते, विचारधारा न मानणार्या इतरांनाही ते मूर्तीपूजक, काफिर किंवा अत्याचारी म्हणतात. आपल्या श्रद्धांचा (मग ती धर्म असो वा विचारधारा) प्रसार करण्यासाठी नैतिकदृष्ट्या निंदनीय असलेल्या हिंसा आणि क्रौर्य कृत्यांचे समर्थन केले जाते किंवा त्याहूनही वाईट, म्हणजे त्याचे उदात्तीकरण केले जाते. संपूर्ण जगात एका सर्वसमावेशक धार्मिक समाजाची आवश्यकता आहे, जिथे उपासनापद्धत किंवा विचारधारेचे पालन न केल्यामुळे कुणालाही हीन लेखले जाणार नाही किंवा जन्मजात ‘काफिर’ किंवा ‘अत्याचारी’ म्हणून वर्गीकृत केले जाणार नाही. सनातन धर्मातील तत्त्वज्ञानाचा अर्थ ओळखणे, म्हणजे हे जाणणे की, ‘ईश्वर सर्व जीवांमध्ये वास करतो, मनुष्य या विश्वाचा स्वामी नाही आणि म्हणूनच त्यामुळे कुणी कुणाचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही.’ धर्म आणि अधर्म या एकाच मापदंडाने आपण जगाकडे पहायला हवे. श्रीविष्णूचे १० अवतार धर्म आणि अधर्म यांतील भेद शिकवतात.
|
६. रामायण आणि महाभारत यांच्यावर आधारित सांस्कृतिक वारसा पुनःस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत !
प्रत्येक कुटुंबाने स्वतःच्या मुलांना इतिहास आणि नैतिक मूल्यांची शिकवण द्यायला हवी. देश, काळ आणि धर्म यांनुसार शाळा अन् समाजाने येणार्या पिढीला देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यांची सकारात्मक ओळख करून द्यायला हवी. मी इतिहासातील विस्तृत कथांचे संक्षिप्त आणि सोप्या भाषेतील सूत्रात लिखाण करत आहे. या मागचा हेतू हाच आहे की, ही सूत्रे वाचून नवीन पिढीच्या मनात जिज्ञासा जागृत व्हावी आणि त्यांनी मूळ इतिहास वाचावा. वर्ष २०२२ मध्ये माझा पहिला ग्रंथ ‘मॅक्सिम्स् फ्रॉम महाभारत (महाभारतातील नीतीवचने)’ हे प्रकाशित झाले आणि ते पुष्कळ लोकप्रिय झाले. सध्या मी ‘मॅक्सिम्स् फ्रॉम रामायण’ (रामायणातील नीतीवचने) हा ग्रंथ लिहीत आहे. सध्याच्या समाजजीवनात रामायण आणि महाभारत यांच्यावर आधारित सांस्कृतिक वारसा पुनःस्थापित करण्याचा माझा प्रयत्न आहे.
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !