मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !

१ महिन्यात प्राथमिक अहवाल, २ र्‍या महिन्यात अंतिम अहवाल

पुणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी राज्यशासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीला १ महिन्यात प्राथमिक अहवाल आणि २ महिन्यांत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. या दुर्घटनेस कारणीभूत असलेल्या मुद्यांची पडताळणी करणे, दायित्व निश्चित करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणे, हे समितीचे कार्य असेल.

महापालिकेच्या कोणत्याही विभागांकडून आवश्यक कागदपत्रे, करारपत्रे, अधिकारी, कर्मचार्‍यांची साक्ष घेणे आणि महापालिकेतील इतर सर्व विभागांनी या चौकशी समितीला संपूर्ण साहाय्य करणे हे बंधनकारक केले आहे.

२ वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबनाची नोटीस !

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १३ जुलै या दिवशी महापालिका पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबनाची ‘कारणे दाखवा नोटीस’ दिली आहे. त्यांच्याकडे असलेला पदभारही काढून घेण्यात आला आहे.