चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच

तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी लाचेची मागणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – वरिष्ठांचे नाव सांगून भूमी खरेदी-विक्रीच्या प्रकरणात २ तक्रार अर्ज दिवाणी स्वरूपाचे दाखवून ते निकाली काढण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कदम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. (रक्षकच बनले भक्षक ! ‘लाचखोरीने बरबटलेली पोलीस यंत्रणा’, हे पोलीस खात्याचे चित्र पालटण्यासाठी पोलीस कधी प्रयत्न करणार ?  – संपादक) या प्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

१. तक्रारदार हे भूमी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या आणि मुलाच्या नावे चाकण उत्तर पोलीस ठाण्यात भूमी व्यवहारातून २ तक्रारी अर्ज आले होते.

२. त्याचे अन्वेषण तानाजी कदम हे करत होते. ‘हे अर्ज वरिष्ठांकडून दिवाणी करून घेतो. त्यासाठी १० लाख रुपये लागतील’ असे सांगितले. तडजोडीनंतर ५ लाख रुपये देण्याचे ठरले.

३. ही रक्कम २ हप्त्यांमध्ये देण्याचे ठरले होते. तक्रारदारांनी १३ मे या दिवशी तक्रार प्रविष्ट केली होती. त्याची छाननी केल्यानंतर कदम यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कदम यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी लाच मागणे म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार’ असून अशांना बडतर्फच करायला हवे !