आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !

  • उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पत्रकार परिषेदत स्पष्टीकरण

  • आजगाव-धाकोरे येथील खाण प्रकल्पाला शासनाचाही विरोध !

(एम्.आय.डी.सी. – महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन, म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ)

आडाळी येथील अवैध उत्खनन

सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील ‘एम्.आय.डी.सी.’ परिसरात अवैधरित्या झालेल्या उत्खननाचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या प्रकरणाची सचिव स्तरावर चौकशी चालू आहे. या चौकशीत जो कुणी दोषी आढळेल, त्याच्यावर गुन्हे नोंद करून कडक कारवाई केली जाईल, तसेच यामध्ये उद्योग विभागाचे संबंधित अधिकारी गुंतले असल्याचे किंवा त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्यास त्यांना तातडीने सेवेतून निलंबित केले जाईल, अशी चेतावणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

उद्योगमंत्री उदय सामंत

१३ जुलै या दिवशी शहरातील पर्णकुटी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत बोलत होते. या वेळी अधिवक्ता स्वप्निल प्रभुआजगावकर उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, ‘‘आजगाव-धाकोरे येथील प्रस्तावित खाण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने शासनाचाही या प्रकल्पाला विरोध राहील. आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’चा विकास करण्यासाठी आणि येथे नवे उद्योग आणण्यासाठी लवकरच गोवा येथे एक विशेष बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये विविध नामांकित आस्थापनांना निमंत्रित केले जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी पर्यटन आणि त्यावर आधारित उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न आहे. तरुणांना रोजगारासाठी ‘स्कील डेव्हलपमेंट’चे (कौशल्य विकासाचे) कार्यालयही संमत करण्यात आले आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी सक्षमपणेसिद्ध होतील.