४० भाविकांच्या गटाला गावातून थेट पंढरपूर सेवा !

पंढरपूर – आषाढी यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरला येणारे वारकरी आणि भाविक यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. चंद्रभागा बसस्थानक येथे आषाढी यात्रेच्या नियोजनाविषयी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी गट नोंदणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बसगाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती लागू रहाणार असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास, तर महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे.
यात्रा काळात पंढरपूर आणि परिसरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) येथे तात्पुरती ४ बसस्थानके उभारण्यात येणार असून तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बैठकीनंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भीमा (देगाव) तात्पुरत्या बसस्थानकाची पहाणी करून भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या वेळी एस्.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नगराध्यक्षा सौ. प्रणिता भालके, प्रांताधिकारी श्री. सचिन इथापे, साहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. नेरपगार, तहसीलदार श्री. सचिन लंगुटे, मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे, विभागीय वाहतूक नियंत्रक श्री. अमोल गोंजारी तसेच एस्.टी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
विठ्ठलनामाचा गजर करत १५ दृष्टीहीन वारकर्यांची ४५० किलोमीटरची पायी वारी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !