विठ्ठलनामाचा गजर करत १५ दृष्टीहीन वारकर्‍यांची ४५० किलोमीटरची पायी वारी !

वाशिम येथील ‘संत सूरदास महाराज दिव्यांग पायी दिंडी’तील १५ दृष्टिहीन वारकरी

धाराशिव – आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात बाळगून वाशिम येथील ‘संत सूरदास महाराज दिव्यांग पायी दिंडी’तील १५ दृष्टीहीन वारकरी तब्बल ४५० किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. त्यांच्या सेवेसाठी ५ स्वयंसेवकही या वारीत सहभागी झाले आहेत.

ही दिंडी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी वारकर्‍यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. डोळ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेता येत नसले, तरी अखंड श्रद्धा, नामस्मरण आणि भक्तीच्या बळावर हे वारकरी पंढरीची वाट चालत असल्याने त्यांच्या जिद्दीचे आणि भक्तीभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हातात टाळ, ढोलकीच्या तालावर भजन आणि मुखी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत ही दिव्यांग दिंडी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असून त्यांची वारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.