रुग्णालयाची तोडफोड करणे आणि डॉक्टरांना मारहाण करणे, हे केवळ कायद्याच्या दृष्टीनेच नाही, तर सामाजिक, मानवी आणि वैद्यकीय दृष्टीनेही पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याविषयी भीती किंवा मृत्यूमुळे निर्माण होणारे दुःख साहजिक असले, तरी त्याचा राग डॉक्टरांवर किंवा रुग्णालयावर काढणे हे चुकीचे आहे.
वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रत्येक आजारावर १०० टक्के बरे होण्याची हमी नसते. डॉक्टर त्यांचे सर्वस्व पणाला लावून रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. एखादी केस अत्यंत गुंतागुंतीची असू शकते. अशा वेळी ‘उपचारात हलगर्जीपणा झाला’, असा थेट निष्कर्ष स्वतःच काढून कायदा हातात घेणे चुकीचे आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमधील ‘व्हेंटिलेटर’, ‘आयसीयू मशिन्स’, ‘स्कॅनिंग मशिन्स’ अत्यंत महागड्या असतात. तोडफोडीमुळे ही यंत्रसामुग्री खराब होते. ती पुन्हा दुरुस्त होईपर्यंत किंवा नवीन येईपर्यंत शेकडो गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. नुकतेच डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी २ डॉक्टरांना मारहाण केली, त्यात एक महिला डॉक्टर आहे. या प्रकरणी आता म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे; पण ही पहिली घटना नाही.

१. महाराष्ट्रात विविध घटना
महाराष्ट्रात मागील ९ वर्षांत रुग्णालयांची तोडफोड आणि डॉक्टरांवर आक्रमणे झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. रुग्णाचा मृत्यू, उपचारात हलगर्जीपणाचा आरोप किंवा गंभीर रुग्णाला दुसर्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा सल्ला देणे, अशा कारणांवरून संतप्त नातेवाईक किंवा जमावाने ही आक्रमणे केली आहेत.
अ. धुळे सिव्हिल हॉस्पिटल (मार्च २०१७) : ही महाराष्ट्रातील सर्वांत भीषण घटना मानली जाते. रस्ता अपघातातील एका गंभीर रुग्णाला ‘न्यूरोसर्जन’ उपलब्ध नसल्याने शासकीय रुग्णालयातील निवासी डॉ. रोहन म्हामुणकर यांनी मुंबई किंवा इतरत्र स्थलांतरित करण्याचा सल्ला दिला. यावरून संतप्त झालेल्या २० ते २५ जणांच्या जमावाने डॉ. म्हामुणकर यांना काठ्या आणि लोखंडी रॉडने पुष्कळ मारहाण केली. यामुळे त्यांच्या डोळ्याला आणि मेंदूला गंभीर इजा झाली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले होते.
आ. सायन रुग्णालय, मुंबई (मार्च २०१७) : एका ६० वर्षीय महिलेचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाइकांनी वॉर्डमध्ये कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरांना पुष्कळ मारहाण केली. या घटनेमुळे मुंबईतील के.ई.एम्., नायर आणि सायन रुग्णालय येथील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रचंड गाजला होता.
इ. ‘कोविड-१९’ काळातील घटना (वर्ष २०२०) : कोरोना महामारीच्या काळात खाटा न मिळणे, प्राणवायूची (ऑक्सिजनची) कमतरता किंवा रुग्णाचा मृत्यू अशा कारणांवरून राज्यातील अनेक ठिकाणी डॉक्टरांवर आक्रमणे झाली.
ई. पुणे (एप्रिल २०२१) : एका ज्येष्ठ डॉक्टरला सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी आणि रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केली होती.

उ. ग्लोबल हॉस्पिटल, नाशिक (वर्ष २०२१) : नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील ‘ग्लोबल हॉस्पिटल’ या खासगी रुग्णालयात एका महिला रुग्णाचा उपचार चालू असतांना मृत्यू झाला. यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येत रुग्णालयाच्या आवारात मोठी तोडफोड केली अन् उपस्थित डॉक्टरांना मारहाण केली.
ए. भारती हॉस्पिटल, पुणे (जानेवारी २०२५) : पुण्यातील धनकवडी परिसरातील भारती हॉस्पिटलमध्ये एका ८६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात येऊन धुमाकूळ घातला. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत ६ ते ७ नातेवाइकांनी (ज्यात महिलांचाही समावेश होता) कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि महिला सुरक्षारक्षकाला शारीरिक अन् शाब्दिक मारहाण केली, तसेच लाकडी स्टूल उचलून विद्युत् कक्षाच्या काचा फोडत रुग्णालयाची तोडफोड केली.
ऐ. वाशी आणि बांद्रा (मुंबई) : कोरोना महामारीसंबंधी चाचणी करण्यास सांगितल्याने किंवा अलगीकरणाच्या नियमांवरून वाद होऊन कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना धक्काबुक्की अन् मारहाण झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
ओ. शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली (जुलै २०२६) : डोंबिवली येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नुकतीच एक गंभीर घटना घडली. रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटकही झाली. सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे मारहाण झालेल्या दोन्ही डॉक्टरांनी तडकाफडकी त्यागपत्र दिले, ज्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले.
२. डॉक्टरांवर आक्रमण करण्यापेक्षा वैध मार्गांचा अवलंब करा !
डॉक्टरांवरील आक्रमणे आणि रुग्णालयांची तोडफोड रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा’ लागू आहे. या कायद्यानुसार डॉक्टरांवर आक्रमण करणे, हा अजामीनपात्र गुन्हा असून यात ३ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड असे शिक्षेचे प्रावधान आहे. जर डॉक्टरांनी खरोखरच हलगर्जीपणा केला असेल, तर कायदा हातात घेण्याऐवजी ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’कडे तक्रार करता येते, पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करता येते किंवा ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. कायदा आणि राज्यघटना यांनी न्यायासाठी योग्य मार्ग दिलेले आहेत, हिंसेमुळे कधीही न्याय मिळत नाही.
– श्री. नित्यानंद भिसे, पनवेल.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, १२.७.२०२६)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
‘स्मार्ट’ फसवणूक !