पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्‍यांसाठी अखंड अन्नछत्र

माऊलींच्या पालखी सोहळ्यात अनोखी विठ्ठलसेवा

पुणे – टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाचा जयघोष आणि कपाळावर बुक्का लावून पंढरीच्या वाटेने निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यासाठी पुणे येथील विश्रांतवाडीत भक्ती आणि सेवा यांचा एक अनोखा संगम पहायला मिळत आहे. आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणार्‍या सहस्रो वारकरी बांधवांसाठी ‘चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने गेल्या २४ वर्षांपासून अविरतपणे अखंड अन्नदान सेवा (महाप्रसाद) राबवली जात आहे. ही सेवा म्हणजे केवळ अन्नदान नसून वारकर्‍यांच्या रूपाने चालून आलेल्या विठ्ठलाचीच मनोभावे केलेली सेवा ठरत आहे. पालखी सोहळ्याच्या कालावधीत सकाळी ८ वाजल्यापासून हे अन्नछत्र अखंडपणे चालू असते. गेल्या २ दशकांहून अधिक काळ ही अविरत सेवा अत्यंत निष्ठेने चालू ठेवण्यात सर्वश्री दिनेश चौधरी, संजीव अग्रवाल आणि ऋषभ वैद्य यांच्यासह त्यांच्या संपूर्ण सहकार्‍यांचा सक्रीय आणि मोलाचा सहभाग आहे. ‘वारकर्‍यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा’, या भावनेने हे सर्वजण प्रतिवर्षी या उपक्रमात स्वतःला झोकून देतात.