स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क

कार्यक्रमांना अनुमती देण्यासाठी शिक्षण खात्याकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

पॅलेस्टाइन च्या समर्थनार्थ  ‘एस्.आय.ओ.’द्वारे केरळ येथे काढण्यात आलेली रॅली 

पणजी, १४ जुलै (वार्ता.) –  स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (‘एस्.आय.ओ.’) या संघटनेच्या किंवा अशा कार्यक्रमांना शाळांमध्ये अनुमती देण्यासंदर्भात शिक्षण खात्याने एका परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या संघटनेची विचारसरणी आणि कारवाया समाजविरोधी अन् देशविरोधी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गोव्यासह देशभरात ही संघटना सुरक्षा यंत्रणा, पोलीस यांच्या निरीक्षणाखाली आहे. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने या संघटनेच्या विचारसरणीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडून शिक्षण संचालनालयाला प्राप्त झालेल्या पत्राच्या आधारे हे परिपत्रक प्रसारित करण्यात आले आहे. त्यापूर्वी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने शिक्षण खात्याचे संचालक श्री. शैलेश झिंगडे आणि उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री. भूषण सावईकर यांच्याकडे १८ नोव्हेंबर २०२५ या दिवशी एका निवेदनाद्वारे ‘एस्.आय.ओ.’ ही केंद्रशासनाने बंदी घातलेल्या ‘जमात-ए-इस्लामी-हिंद’ या कट्टरतावादी संघटनेचा विद्यार्थी विभाग असून या संघटनेला राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम राबवण्यावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली होती.

(नोव्हेंबर २०२५ मध्ये अशी मागणी करूनही ८ महिन्यांनंतर, हे परिपत्रक प्रसारित होणे दुर्दैवी ! तोपर्यंत या संघटनेने किती उपद्व्याप केले असतील ? याला उत्तरदायी कोण ? – संपादक)

स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या राज्यातील काही शैक्षणिक संस्थांमधील कार्यक्रमांविषयी गोव्याच्या विशेष शाखेच्या पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा उपक्रमांमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

परिपत्रकामध्ये दिलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. कोणतीही बाह्य व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, व्याख्यान, चर्चासत्र, जनजागृती कार्यक्रम किंवा अन्य उपक्रम राबवण्यापूर्वी संबंधित सक्षम अधिकारी यांची लेखी पूर्वानुमती घेणे बंधनकारक आहे.

२. शाळांमध्ये सांप्रदायिक स्वरूपाचे ज्ञान देणे किंवा शिक्षणाशी संबंधित नसलेले उपक्रम राबवणे, हे गोवा शालेय शिक्षण अधिनियम १९८४ आणि नियम १९८६ मधील प्रावधानांच्या विरोधी आहे.

३. शाळांमध्ये बाह्य व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याची माहिती त्वरित स्थानिक पोलीस आणि शिक्षण संचालनालयात द्यावी, तसेच सर्व शाळांनी बाह्य अभ्यागत अन् आयोजित कार्यक्रमांची स्वतंत्र नोंदवही ठेवणे बंधनकारक आहे.

४. अनुमती मिळालेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी संबंधित शाळेतील उत्तरदायी शिक्षक किंवा प्राध्यापक उपस्थित रहाणे अनिवार्य करण्यात आले आहे. कार्यक्रमातील विषय हे घटनात्मक मूल्ये आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या चौकटीतच रहातील, याची निश्चिती करण्याचे उत्तरदायित्व त्यांच्यावर असेल.

५. शिक्षण संचालनालयाच्या विभागीय अधिकार्‍यांकडून या निर्देशांच्या कार्यवाहीची वेळोवेळी पडताळणी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणार्‍या संस्थांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.


हिंदु राष्ट्र समन्वय समितीने ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ याचे उघड केलेले स्वरूप

नोव्हेंबर २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र समन्वय समितीने शिक्षण खात्याला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की,‘एस्.आय.ओ.’ या संघटनेचे प्रतिनिधी गोव्यातील अनेक शिक्षण संस्थांना संपर्क करून शैक्षणिक संस्थेमध्ये ‘स्टुडंट चॅलेंजेस’ (विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने), ‘एथिकल व्हॅल्यूज’ (नैतिक मूल्ये) आणि ‘रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप’ (उत्तरदायी नागरिक बनणे) या विषयांवर सत्रे घेणार असल्याचे सांगत आहे. ‘एस.आय.ओ.’चा टर्की येथील ‘टर्कीश युथ फेडरेशन’ या कट्टरतावादी संघटनेशी संबंध असल्याचे यापूर्वी देशातील अन्वेषण यंत्रणेच्या अन्वेषणातून उघड झालेले आहे. ‘एस.आय.ओ.’ या संघटनेने चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात दाबोळी, वास्को येथील ‘केशव स्मृती शाळा’ आणि बायणा सरकारी हायस्कूल येथील हिंदु विद्यार्थ्यांना योग्य अनुमती न घेता मशिदीत नेऊन तेथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. तेथील पालकांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर ‘विश्व हिंदु परिषदे’ने याला तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर संबंधितांवर कारवाई झाली होती. ‘एस्.आय.ओ.’सारख्या कट्टरतावादी संघटना समुपदेशन, व्यक्तीमत्त्व विकास आदी गोंडस नावाने विद्यार्थ्यांमध्ये कट्टरतावाद पसरवत असतात. देहली येथे १० नोव्हेंबर या दिवशी बाँबस्फोटातील आतंकवादी मॉड्यूलमुळे युवकांना लक्ष्य करण्याचे धोके अधोरेखित झालेले आहेत.