‘समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोध’ या ग्रंथातील उल्लेखांवरून ‘त्यांचा अनेक ग्रंथांचा चांगला अभ्यास होता’, हे स्पष्टपणे जाणवते. दासबोधातील काही संदर्भांवरून ‘१०८ या जपसंख्येचा शोध घेता येईल का ?’, ते पाहूया.

१. चांद्रवर्षाच्या गणितावरून १०८ या अंकाचे महत्त्व !
कालगणनेशी १०८ चे नाते दाखवता येते. आपण हिंदु पंचांगाच्या कालगणनेनुसार चांद्रमास मानतो. त्यामुळे अमावास्येनंतर मराठी मास पालटतो. चंद्र आकाशातील एका स्थानापासून प्रत्येक दिवशी १२ अंशांनी आपले स्थान पालटतो. त्यामुळे ३६० अंश फिरून परत त्या स्थानी येण्यास चंद्राला साधारणतः ३० दिवस लागतात. याला आपण ‘चांद्रमास’ असे म्हणतो. त्यामुळे चांद्रवर्ष हे साधारणतः ३६० दिवसांचे होते. एका दिवसात २४ घंटे असतात. तेव्हा चांद्रवर्षाचे ३६० Ñ २४ = ८,६४० घंटे होतील. ही संख्या १०८ च्या पटीतील आहे. तिला १०८ ने निःशेष भाग जातो.
१०८ मण्यांच्या माळेने नामजप करण्याचे महत्त्व !
‘हिंदूंच्या जपमाळेत बहुधा १०८ मणी असतात. आपल्या शरिरात १०८ संवेदनाबिंदू आहेत. त्यांचा संबंध कुंडलिनीयोगाशी आहे. १०८ मण्यांच्या माळेने जप केल्यास सर्वार्थाने सिद्धी होते.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘नामजप करण्याच्या पद्धती’)
२. शास्त्राधारे केलेल्या युगांच्या कालगणनेशी जोडलेले १०८ या जपसंख्येचे नाते !

वेदांमध्ये सांगितले आहे, ‘ही दृश्य सृष्टी अनादि-अनंत नाही. तिची जडण-घडण होत असते. केवळ परमेश्वरी तत्त्व अनादि-अनंत आहे. ‘जेव्हा ब्रह्मदेवाची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा ही सृष्टी नाश पावेल’, असे शास्त्रात सांगितले आहे. ब्रह्मदेवाच्या १ दिवसात १४ मन्वंतरे होतात. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे होतात आणि १ महायुग हे ४३ लक्ष २० सहस्र वर्षांचे असते. यावरून गणित मांडून सृष्टीच्या कालाची कल्पना करता येईल. अशा या महायुगाची सविस्तर माहिती समर्थ रामदासस्वामींच्या दासबोधात दशक ६, समास ४ मध्ये मिळते. एका महायुगात कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, अशी ४ युगे निर्माण होतात. त्यांचा कालावधी शास्त्रात सविस्तर दिला आहे. दासबोधातील ब्रह्मनिरूपण समासातील त्या संबंधीच्या ओव्या पुढीलप्रमाणे आहेत.
‘कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्र ।
त्रेतायुग बारा लक्ष शाण्णव सहस्र ।
द्वापरयुग आठ लक्ष चौसष्ट सहस्र ।
आतां कलियुग ऐका ।।
कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्र ।
चतुर्युगें त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र ।
ऐशीं चतुर्युगें सहस्र ।
तो ब्रह्मयाचा एक दिवस ।। ’
– दासबोध, समास ६, दशक ४, ओवी १ आणि २
शास्त्रात सांगितलेली ही एका महायुगाची कालमर्यादा दासबोधातील वरील ओव्यांत समर्थ रामदासस्वामींनी स्पष्टपणे सांगितली आहे. वरील ओव्यांच्या आधारे ती आपल्याला पुढीलप्रमाणे मांडता येईल.

या चारही युगांची सरासरी काढली, तर ती ४३,२०,००० / ४ = १०,८०,००० अशी येईल. ‘या संख्येचा एक दशांश १०८ आहे’, हे सहज लक्षात येते. १०८ वेळा जप करत असतांना शास्त्राधारे केलेल्या युगांच्या कालगणनेशी आपण नाते जोडत असतो.
‘आपल्या पूर्वजांनी ‘१०८’ ही जपसंख्या ठरवतांना कशा प्रकारे विचार केला असेल ?’, हे आज जरी समजणे कठीण असले, तरी त्यावर विचार करून वेगवेगळी कारणे शोधता येतील आणि जप करतांना त्या अनादि-अनंत परब्रह्माचा साक्षात्कार होण्यास साहाय्य होईल.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।’
– श्री. सुरेश जाखडी, पवई, मुंबई. (एप्रिल २०१७)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
‘स्मार्ट’ फसवणूक !