मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !

 ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या कोषाध्यक्षपदाच्या त्यागपत्राविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे विधान

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

पुणे, १४ जुलै (वार्ता.) – कालपासून सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये माझ्या त्यागपत्राच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्या पूर्णत: खोट्या आणि कपोलकल्पित आहेत. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या ‘कोषाध्यक्ष’पदाचा त्याग करण्याचा मी विचारही करत नाही. मी मैदान सोडून पळून जाणारा नाही. शेवटपर्यंत संघर्ष करत राहीन. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक आहे, असे विधान अयोध्येतील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी पुणे येथील ‘धर्मश्री’च्या प्रांगणामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी मांडलेली सूत्रे

१. श्रीराममंदिरातील दान चोरी प्रकरणात जे कुणी अटक केलेले आहेत, ते सर्व ‘एस्.बी.आय.’ (स्टेट बँक ऑफ इंडिया) या अधिकोष आस्थापनाचे कर्मचारी आहेत. यात ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चा यात कोणताही कर्मचारी किंवा पदाधिकारी यांचा सहभाग नाही. दानाच्या रकमेची मोजणी आणि त्याची व्यवस्था पहाण्याचे दायित्व  हे ‘एस्.बी.आय.’कडे दिलेले आहे. या प्रक्रियेत जे काही कर्मचारी आहेत, ते ‘एस्.बी.आय.’ने नियुक्त केलेले आहेत.

२. ‘एस्.आय.टी.’ (विशेष अन्वेषण पथक) चौकशीने अंतर्गत अहवाल दिलेला आहे; पण अंतिम अहवाल आल्यानंतर त्यावर ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’कडून कारवाई केली जाईल. उत्तरप्रदेश उच्च न्यायालय आणि ‘एस्.आय.टी.’ यांच्याकडून होत असलेल्या चौकशीविषयी मी समाधानी आहे.

३. काही महिन्यांपूर्वी ‘राममंदिरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या, चांदीच्या विटा चोरीला गेल्या’, अशी अफवा पसरली होती. त्या वेळी विश्वस्तांनी प्रसारमाध्यमांसमोर भक्तांनी दान केलेल्या २ सहस्र ९२६ मौल्यवान वस्तू दाखवल्या होत्या.

४. न्यासाचे महासचिव श्री. चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांनी लक्ष न दिल्यामुळे ही घटना घडली. चंपत राय यांनी स्वेच्छेने त्यागपत्र दिले आहे. न्यासाच्या घटनेनुसार त्यागपत्र दिले, म्हणजे ते स्वीकारले असे आहे.

५. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर न्यासा’चा कोषाध्यक्ष म्हणून या सर्व घटनेचे नैतिक दायित्व माझ्याकडे आहे, हे निश्चित आहे. या घटनेचा खेद, दु:ख वाटते. लाजेने मान खाली जाईल, अशी घटना आहे. मी कोषाध्यक्ष आहे म्हणून या प्रकरणावर दबाव टाकेन, प्रभाव टाकेन अशी कोणतीही कृती माझ्याकडून आजपर्यंत झालेली नाही आणि येथूनही पुढे होणार नाही.

६. श्रीराममंदिरामध्ये घडलेली चोरीच्या घटनेनंतर राममंदिरामध्ये ७० पंडितांच्या माध्यमातून ‘स्थान नामजप यज्ञ’, असे धार्मिक विधी केले जात आहेत.