शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !

‘स्वाध्याय परिवारा’चे प्रणेते, तत्त्वज्ञ, कर्मयोगी आणि आधुनिक काळातील अध्यात्माला समाजजीवनाशी जोडणारे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांनी मानवामध्ये दडलेल्या ईश्वरत्वाचा शोध घेण्याचा अद्वितीय विचार जगासमोर मांडला. ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा वसतो, त्यामुळे कुठलीही व्यक्ती हलकी नाही’, हा त्यांचा संदेश लाखो कुटुंबांच्या जीवनाचा आधार बनला. त्या दिव्य विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे महान कार्य आदरणीय दीदी (धनश्री तळवलकर) गेली अनेक वर्षे अत्यंत शांतपणे, निष्ठेने आणि समर्पणाने करत आहेत. आदरणीय दीदींच्या जन्मदिनी, म्हणजे १२ जुलै हा दिवस स्वाध्याय परिवारात वृक्षमंदिर, युवा आणि ‘माधव वृंददिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वृक्षाप्रमाणे निःस्वार्थपणे देत रहाणे, सावली देणे, फळे देणे आणि स्वतःचे अस्तित्व इतरांच्या कल्याणासाठी अर्पण करणे’, हा या दिवसामागील संदेश आहे. हा दिवस केवळ वाढदिवस नसून सेवा, समर्पण आणि भक्ती यांचा उत्सव आहे.

प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी)

१. प.पू. दादाजींच्या ‘स्वाध्याय परिवारा’ला सातत्याने प्रेरणा देणार्‍या आदरणीय दीदी !

प.पू. दादाजींच्या महाप्रयाणानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते की, एवढ्या विशाल ‘स्वाध्याय परिवारा’चे नेतृत्व कोण करणार ? देश-विदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या ‘स्वाध्याय परिवारा’ला प.पू. दादाजींप्रमाणे खंबीरपणे आणि भक्तीच्या वाटेवर कार्यतत्पर कोण ठेवणार; पण वयाच्या सत्तरीमध्ये प्रवेश केलेल्या आदरणीय दीदी केवळ आठवले कुटुंबाच्या परंपरेच्या वारसदार म्हणून नव्हे, तर प.पू. दादांनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून उभारलेल्या ‘ईश्वरी कार्याच्या समर्पित संवाहक’ म्हणून उभ्या आहेत. प.पू. दादाजींनी रुजवलेल्या भक्ती, स्वाध्याय, आत्मजागृती आणि समाजपरिवर्तन यांच्या विचारवृक्षाला त्यांनी स्वतःच्या शांत, संयमी अन् दूरदर्शी नेतृत्वाने अधिक बळकट, तसेच स्थिर केले आहे. जगभरातील ‘स्वाध्याय परिवारा’ला सातत्याने प्रेरणा देत नव्या पिढीला संस्कार, सेवा आणि संस्कृतीचा वारसा स्वीकारण्यास प्रोत्साहित करत आहेत, यासह नवकार्यासाठी नवीन दिशा देण्याचे त्यांचे कार्य अखंड चालू आहे. त्यांचे संपूर्ण जीवन हे प्रसिद्धीपेक्षा कर्तव्याला, व्यक्तीपूजेपेक्षा ईश्वर भक्तीला आणि स्वार्थापेक्षा समाजहिताला अर्पण झालेले आहे.

धनश्री तळवलकर  (दीदी)

२. प.पू. दादाजींच्या तत्त्वज्ञानाची वैश्विक उपयुक्तता आंतरराष्ट्रीय परिषदांमधून मांडणे

मुंबईतील ‘माधवबाग पाठशाळा’, ठाण्यातील ‘तत्त्वज्ञान विद्यापीठ’, तसेच ‘स्वाध्याय परिवारा’शी निगडित विविध संस्था आणि उपक्रम यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी त्या सातत्याने लक्ष देत असतात. बालसंस्कार केंद्रे, डीबीटी, कॅसेट केंद्रे, स्वाध्याय केंद्रे आणि विविध संस्कारवर्ग यांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत

प.पू. दादाजींचे विचार पोचावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत चालू आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या कार्यकर्त्यांना केवळ प्रवचन वा सूचना देत नाहीत, तर त्यांच्यामध्ये श्रद्धा, आत्मविश्वास आणि कर्तव्यभावना यांचे बीजही रुजवतात. स्वतःच्या आयुष्यातील सुख-दुःख बाजूला ठेवून त्यांनी सतत भारतभर आणि विदेशात प्रवास केला. विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन प.पू. दादाजींच्या तत्त्वज्ञानाची वैश्विक उपयुक्तता त्यांनी प्रभावीपणे मांडली. आजच्या ताणतणावग्रस्त, स्पर्धात्मक आणि मूल्यसंकटाच्या काळात ‘स्वाध्याया’चा संदेश किती आवश्यक आहे, हे त्यांनी जगाला पटवून दिले.

३. सध्याच्या युद्धकाळात आणि तणावाच्या परिस्थितीत प.पू. दादाजींचे विचार अनुकरणीय

भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात, त्याचेच अनुकरण समाज करतो.’ आदरणीय दीदींचे जीवन गीतेच्या या संदेशाचे मूर्त उदाहरण आहे. त्यांचा साधेपणा, नम्रता, शिस्त, अभ्यास आणि अखंड कार्यतत्परता प्रत्येक स्वाध्यायीला प्रेरणा देणारी आहे. आदरणीय दीदींनी कर्तृत्वाच्या उंच शिखरावर पोचूनही विनम्रतेचा आणि सेवाभावाचा आदर्श कायम ठेवला आहे. त्यांचे नेतृत्व अधिकारावर नव्हे, तर प्रेम, विश्वास आणि आत्मीयतेवर आधारलेले आहे. आज जगाला भौतिक प्रगतीसह नैतिक मूल्यांचीही आवश्यकता आहे. स्वार्थ, हिंसा, युद्ध, तणाव आणि विघटन यांच्या वातावरणात प.पू. दादाजींच्या विचारांचा प्रकाश अधिकच महत्त्वाचा ठरतो. तो प्रकाश अखंड प्रज्वलित ठेवण्याचे कार्य आदरणीय दीदी सातत्याने करत आहेत.

वृक्षमंदिर माधव वृंद दिनानिमित्त आपण सर्व स्वाध्यायी आदरणीय दीदींच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि अखंड कार्यशक्तीची परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

सत्तरीचा हा सुवर्ण सोहळा, सेवाधर्म अखंड चालो ।

प.पू. दादांनी लावलेला भक्तीवृक्ष, दीदींनी विश्वभर फुलवो ।।

स्वाध्यायाची ज्योत तेवत राहो, संस्कारांचा सुगंध दरवळो ।

ईश्वरकृपेने दीर्घायुष्य लाभो, विश्वकुटुंब आनंदे नांदो ।।

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व). (१३.७.२०२६)