थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)

‘महावितरण’कडून बायोमेट्रिक नोंदी

मुंबई – वीजग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण व्हावे आणि वीज सेवेचा दर्जा सुधारावा, यासाठी ‘महावितरण’च्या भांडुप परिमंडळाने कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसाठी ‘बायोमेट्रिक नोंदी’चा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे विलंबाने येणे आणि सुटी घेणे यांना चाप बसेल.


मंत्र्यांची अपकीर्ती; ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद ! 

नागपूर – केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या संदर्भात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी बिहारमधील यूट्यूबर मनीष कश्यपसह ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


अल्पवयीन मुलीची प्रसूती; गुन्हा नोंद !

नाशिक – येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील इयत्ता ९ वीतील विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला. तिच्या नात्यातील अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.


नोंदणीच्या कामाला कंटाळून शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई – देशभरात राबवण्यात येणार्‍या एस्.आय.आर्.च्या नोंदणीच्या कामाला कंटाळून घाटकोपरच्या असल्फा विभागातील शिक्षिका उमा त्रिलोटकर यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पती आजारी, तसेच कामाचा ताण यांविषयी सांगूनही प्रशासनाने नोंद न घेतल्याने त्यांनी वरील प्रकार केला. रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

संपादकीय भूमिका : शिक्षकच आत्महत्या करू लागले, तर विद्यार्थ्यांना कोण घडवणार ?


२५ सहस्र ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग पालिका पुरवणार 

मुंबई – मुंबईतील गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी महानगरपालिकेने मूर्तीकारांना २५ सहस्र ४०० लिटर पर्यावरणपूरक रंगांचा विनामूल्य पुरवठा करण्याची सिद्धता केली आहे. यासाठी पालिकेकडून सुमारे १ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.


कर्जमाफी योजनेच्या अटी सरकारकडून शिथिल !

मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ममुक्ती योजना २०२६’च्या अटी शिथिल करण्याचा निर्णय १४ जुलै या दिवशी मंत्रीमंडळात घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांसह अन्य मंत्री उपस्थित होते. योजनेतील नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना लाभ देण्याची अट रहित करण्यात आली आहे. त्यामुळे २३ लाख शेतकर्‍यांनाही प्रोत्साहनपर लाभ होणार आहे.

मंत्रीमंडळात घेतलेले अन्य महत्तवाचे निर्णय !

१. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरण मंत्रीमंडळाने संमत केले. अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना मिळकतीचे उत्पन्नाचे उपाय यांतून शोधण्यात येतील.

२. बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या २४ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामांना मंत्रीमंडळाने संमती दिली.

३. ‘अपराधी परिविक्षा अधिनियम, १९५८’ अंतर्गत मुक्तबंदी आणि परिविक्षाधीन बंदी यांना देण्यात येणार्‍या साहाय्यक अनुदान योजनेच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. निर्दाेष सुटणार्‍या बंदीवानांना यापुढे २५ सहस्र रुपयांऐवजी ५० सहस्र रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

४. एस्.टी. महामंडळाच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास खासगी भागीदारांच्या साहाय्याने करण्याचा निर्णय सरकारने घेतला. याद्वारे जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागांतील बसस्थानक अन् महामंडळाच्या जागा यांचा विकास करण्यास मान्यता देण्यात आली आहे.