मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !

(सॅटेलाईट फोन हा असा भ्रमणभाष आहे, जो भूमीवरील भ्रमणभाष टॉवरऐवजी थेट अंतराळातील उपग्रहांशी संपर्क साधून काम करतो. यामुळे समुद्र, जंगल किंवा उंच पर्वतांवर, जिथे सामान्य ‘नेटवर्क’ नसते, तिथेही अखंडित बोलणे आणि मेसेज करणे शक्य होते.)

बी.एस्.एन्.एल् द्वारा तयार करण्यात आलेला सॅटेलाईट फोन

मुंबई – राज्यातील मासेमारांना खोल समुद्रात मासेमारी करतांना कोणत्याही परिस्थितीत किनार्‍याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ साहाय्य मिळावे आणि हवामान, तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी ‘सॅटेलाईट फोन’ सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने भारत संचार निगम लिमिटेडच्या (बी.एस्.एन्.एल्.च्या) अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा केली आहे.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री राणे व अन्य अधिकारी

या विषयाच्या अनुषंगाने मंत्रालयात मंत्री राणे यांच्या दालनात आयोजित बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, बी.एस्.एन्.एल्.चे वरिष्ठ व्यवस्थापक सुहास मानकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, ‘‘राज्यातील मासेमारांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. खोल समुद्रात भ्रमणभाषचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत ‘सॅटेलाईट फोन’ सुविधा मासेमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल. यामुळे समुद्रातील सुरक्षा, बचावकार्य आणि संप्रेषण अधिक प्रभावी होईल.