ईशान्य भारतीय स्थानिक युवा पिढीला राष्ट्रीय प्रवाहात आणणारे जयवंत कोंडविलकर !

‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे कार्यवाह श्री. जयवंत कोंडविलकर त्यांचे गुरु भय्याजी काणे यांच्या प्रेरणेने गेली ५० वर्षे पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागात शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव जागरूक करण्यात कार्यरत आहेत.

माणसाला कार्यरत करते ती भावना. बुद्धी फार तर दिशा देईल; परंतु देशाविषयीची उत्कट भावनाच कार्यकर्त्यांना खर्‍या अर्थाने बळ देत असते. पूर्वोत्तर भारताचा सीमा भाग हा धार्मिक दबाव, फुटीरतावाद, मादक द्रव्यांचा व्यापार आणि आतंकवाद अशा नानाविध समस्यांना सातत्याने सामोरा जाणारा प्रदेश आहे. या प्रदेशात राष्ट्रीयत्वाची भावना हळुवारपणे रुजवण्यासाठी रत्नागिरीहून पूर्वोत्तर भारतात जाणारे शिक्षक भय्याजी काणे आणि त्यांचे शिष्य जयवंत कोंडविलकर यांच्या जीवन समर्पणाचा हा प्रवास आहे. राष्ट्र उभारणीचे बीज खोलवर रुजले की, काय करून घेऊ शकते ? देशाशी, भारतीय संस्कृतीशी जनतेला आणि मुलांना जोडून घ्यायचे, हा विचार कृतीत आणतांना कितीतरी आव्हाने सामोरी आली, तरीही जिवावर उदार होऊन सेवा कशी करता येते, याचे प्रात्यक्षिक या दोघांनी दाखवून दिले आहे.

श्री. जयवंत कोंडविलकर

विशेष सदर


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. जयवंत कोंडविलकर यांचा परिचय आणि ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ची स्थापना

महाराष्ट्राचे भूमीपुत्र आणि स्वयंसेवक दिवंगत शंकर दिनकर (भैय्याजी) काणे

द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन ईशान्य भारतात राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतलेले महाराष्ट्राचे भूमीपुत्र आणि स्वयंसेवक दिवंगत शंकर दिनकर (भैय्याजी) काणे यांनी कोकणातील जयवंत कोंडविलकर यांच्या समवेत हे कार्य वर्ष १९७२ मध्ये चालू केले आहे. त्यांनी मणीपूरमध्ये वयाच्या १२ व्या वर्षापासून वास्तव्य केले होते. गेली ५० हून अधिक वर्षे ते प्रयत्नशील राहून ईशान्य भारतातील फुटीरतावादी शक्तींना रोखण्यासाठी सकारात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न करत आहेत.

पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागाचा अभ्यास केल्यावर समजते की, तेथील परिस्थिती किती गुंतागुंतीची आणि चिंताजनक आहे. भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळापासून वेगळेपणाची भावना तेथील स्थानिक वनवासींमध्ये रूजली होती. तिथे असलेल्या मूळ स्थानिक वनवासींच्या विविध जातीजमातींमध्ये काही परकीय शक्तींनी धार्मिक दबावतंत्राचा वापर करून दुहीची बीजे पद्धतशीरपणे पेरली गेली. त्या निमित्त काही विघातक शक्तींनी पूर्वोत्तर भारतात चंचूप्रवेश केला. ऑक्टोबर १९४७ मध्ये मणीपूर संस्थान भारतात विलीन झाले; परंतु स्वतंत्र भारताच्या ७७ वर्षांच्या इतिहासात जवळपास ६६ वर्षे अष्टलक्ष्मी प्रदेशाचा विशेषत: सीमा भागाचा विकास दुर्लक्षित राहिला. गेल्या ११ वर्षांत नक्कीच हे चित्र पालटत आहे.

या भागातील फुटीरतावाद, मादक द्रव्य आणि धार्मिक दबावतंत्र यांच्या माध्यमातून परकीय शक्तींची ढवळाढवळ अशा समस्यांना सामोरे जायचे, तर तेथील वनवासींच्या संस्कृतीला समजून घेऊन त्यांच्यात आपलेपणाची भावना हळूवारपणे निर्माण करून आणि युवा पिढीत विकासाभिमुख उज्जल भविष्य घडवण्याची स्वप्ने सत्यात उतरवण्याचे बळ देण्याचे कार्य सातत्याने करत रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी सेवाभावी संस्था आणि सामुदायिक स्तरावर प्रयत्नशील रहावे लागेल. भय्याजी काणे आणि जयवंत कोंडविलकर या गुरु-शिष्य जोडीने हे कार्य वर्ष १९७२ पासून अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतही चालू ठेवले. या कार्याला संस्थात्मक रूप देण्यासाठी वर्ष १९८६ मध्ये ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली.

श्री शंकर दिनकर उर्फ ​​भय्याजी काणे यांचे स्वप्न !

महाराष्ट्राचे भूमीपुत्र आणि स्वयंसेवक दिवंगत शंकर दिनकर (भैय्याजी) काणे

वर्ष १९७२ ते २००० या काळात पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महाराष्ट्रात आणले. येथे शिक्षण घेत असतांना मिळालेली आपुलकी आणि मूल्ये यांच्या आधारे पूर्वोत्तर भारतातील हे वनवासी विद्यार्थी पुन्हा त्यांच्या प्रदेशात जाऊन स्वत:चे भविष्य घडवू लागलेच; परंतु भारतीयत्वाच्या विचारांचा प्रसार करू लागले. पूर्वांचल वसतिगृहांच्या संकल्पनेला आकार आला तो याच विचारातून !

म्यानमारच्या सीमेजवळ असलेले ‘ओजा शंकर विद्यालय’ आणि सोबत श्री. जयवंत कोंडविलकर

२. ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चा उद्देश

वर्ष १९९९ मध्ये भय्याजींचे निधन झाले. ‘शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता’ हे भय्याजींचे स्वप्न अजून शक्तीनिशी पुढे नेण्याचा संकल्प करून श्री. जयवंत कोंडविलकर यांनी केला. मणीपूरमधील सहकार्‍यांच्या साहाय्याने वर्ष २००२ मध्ये श्री. कोंडविलकर यांनी त्यांचे मार्गदर्शक भय्याजी काणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खारासोम या म्यानमारच्या सीमेजवळ पहिले ‘ओजा शंकर विद्यालय’ स्थापन केले. पुढे वर्ष २००९ मध्ये तमेंलोंग येथे ‘पौ. शंकर काणे विद्यालय’, तर वर्ष २०१५ मध्ये चुराचांदपुर येथे ‘पू. शंकर काणे विद्यालय’ चालू केले. पूर्वोत्तर भारतातील सीमा भागात मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणायचे काम भय्याजी काणे आणि त्यांच्या नंतर श्री. जयवंत कोंडविलकर यांनी केले. पूर्वोत्तर भारतात धार्मिक दबाव वाढवण्यासाठी कार्यरत संस्थांना मोठ्या प्रमाणात परकीय वित्तीय साहाय्य मिळत असते. या संस्थांच्या माध्यमातून चालणार्‍या शाळा विनामूल्य शिक्षण पुरवत असत; म्हणून भय्याजी काणे आणि श्री. जयवंत कोंडविलकर यांनाही प्रारंभीला विनामूल्य शिक्षण देऊन तेथील युवा पिढीत चांगले भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाची आवड निर्माण करावी लागली. यालासुद्धा पहिल्यांदा अनेक भारतविरोधी फुटीरतावादी आणि आतंकवादी गटांकडून प्रखर विरोध होत राहिला; परंतु स्थानिकांच्या विश्वासातून हे कार्य चालू राहिले; पण हे साध्य होण्यासाठी किमान ४० वर्षे त्यांना समर्पित करावी लागली. ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून मणीपूर येथील सीमा भागात सध्या ३ शाळांमध्ये ४०० हून अधिक स्थानिक विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत.

४० हून अधिक वर्षे पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागात राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यासाठी श्री. जयवंत कोंडविलकर यांनी जीवन समर्पित केले आहे. १६ हून अधिक वेळा जिवावर बेततील अशा संकटांना, आतंकवादी गटांना, भूमीगत गटांच्या विरोधाला प्रसंगावधान राखून अनेक वेळा ते धाडसाने सामोरे गेले आहेत, जणू या ईश्वरी कार्यासाठी त्यांचा वारंवार झालेला पुनर्जन्मच ! या सर्व प्रसंगांना केवळ ते सामोरेच गेले नाहीत, तर त्या प्रदेशात त्यांनी स्वत:ची आणि संस्थेची विश्वासाहर्ता निर्माण केली. जयवंतजींचा जीवन प्रवास चित्तथरारक चित्रपटापेक्षा अल्प नाही.

३. ईशान्य भारतीय स्थानिक युवा पिढीला राष्ट्रीय प्रवाहात आणणे हाच खरा उपाय !

श्री. कोंडविलकर म्हणतात, ‘‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) या मूल्यांच्या आधारे भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल, तर नागरिकांच्या मनामध्ये प्रखर एकात्मतेची ज्योत सतत धगधगत रहायला हवी. २१ व्या शतकातील पालटणारी भू-राजकीय समीकरणे आणि हिंद-पॅसिफिक भागाचे वाढते महत्त्व यांचा विचार करता पूर्वोत्तर भारत सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरतो. यामुळेच तेथील समस्यांच्या मुळाशी जाऊन काम करणे आवश्यक आहे. म्हणून ईशान्य भारतीय स्थानिक युवा पिढीला राष्ट्रीय प्रवाहात आणणे, हाच खरा उपाय आहे.’’

मणीपूरच्या घटनेनंतर देशभर झालेली आंदोलने, नागा आणि मैतेई यांच्यात आरक्षणाच्या नावाखाली पद्धतशीरपणे दंगली घडवण्याचे कारस्थान, सीमेवर आतंकवाद्यांची अफीमची (अमली पदार्थ) शेती, वारंवार घडणारी हिंसा, अत्याचार, राष्ट्र उभारणीत योगदान देणार्‍या सैन्य अधिकार्‍यांच्या हत्या, या सर्व गोष्टींना परकीय शक्तींचा असलेला छुपा पाठिंबा या घटनाक्रमांकडे पाहिले, तर मणीपूर सतत का धगधगत असते ? हे लक्षात येईल.

४. ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे कार्य

मणीपूर राज्यामध्ये जशा या शाळा आहेत, तसेच तेथील मुलांना पुढचे उच्च शिक्षण मिळावे, देशाची मूळ संस्कृती समजावी, यासाठी महाराष्ट्रात त्यांच्यासाठी वसतीगृहे चालू करण्यात आली आहेत. ‘ज्ञानप्रबोधिनी’ आणि ‘जनकल्याण समिती’ या दोन्ही मान्यवर संस्थांचे उत्तम सहकार्य या कामास लाभत आहे. संस्थेला राष्ट्रीय एकात्मतेसह सामाजिक समरसता, पूर्वोत्तर सीमा भागाचा शाश्वत विकास आणि उत्तुंग कामगिरी करून राष्ट्र विकासात योगदान देणारी युवा पिढी घडवणे यांसाठी कार्य करायचे आहे.

मणीपूर येथे चालू असलेल्या तीनही शाळांना सक्षम करून पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागातील वनवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रदेशात राहून पुढील शिक्षण घेता यावे, वनवासींमध्ये सांस्कृतिक संवर्धन आणि आधुनिकतेची सांगड घालायची असेल, तर या तीनही शाळांना अद्ययावत् करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत शाळांमध्ये अपुर्‍या सोयीसुविधा आहेत. त्यानुसार संस्थेने कार्यविस्तार योजना सिद्ध केली आहे. भविष्यात सध्याच्या सोयी-सुविधा अद्ययावत् करून १० वीपर्यंतचे वर्ग चालू करणे, पूर्वोत्तर भारताच्या सीमा मूल्याधिष्ठित शिक्षण देणार्‍या शाळांचे जाळे निर्माण करणे, भविष्यातील वाटचालीविषयी  मार्गदर्शन केंद्रांची उभारणी करणे, वैज्ञानिक कुतूहल निर्माण करण्यासाठी फिरत्या प्रयोगशाळांचा प्रकल्प राबवणे, जैविक आणि सांस्कृतिक संशोधनाला प्रोत्साहन देणे, क्रीडा संकुल उभारणे, कौशल्य केंद्रांची उभारणी करणे, आरोग्य सुविधा निर्माण करणे, असे नानाविध प्रकल्प हाती घ्यायचे आहेत. अजून पुष्कळ लांबचा पल्ला गाठायचा आहे. स्थानिकांचा सहभाग आणि देशाच्या इतर भागांतील नागरिकांचा पूर्वोत्तर भारताकडे बघण्याचा सकरात्मक दृष्टीकोन यांची सांगड घालून त्या प्रदेशातील वनवासींच्या मनात भारतीयत्व रुजवण्यासाठी स्वतःच्या परीने योगदान देणे, हीच भय्याजी काणे यांच्या कार्याला असलेली मानवंदना असेल. श्री. जयवंत कोंडविलकर म्हणतात त्याप्रमाणे मार्ग लांबचा आणि खडतर आहे; परंतु तोच एकमेव मार्ग आहे आणि ध्येयपूर्तीचा जलद मार्ग आहे. राष्ट्रीयत्वाच्या विचारांचा प्रखर प्रकाशच पुढील मार्ग दाखवू शकतो, हेच खरे !

आवाहन


‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’च्या विस्तार कार्याला निधीची आवश्यकता आहे. संस्थेचे कार्य हे पूर्णत: सामाजिक पाठिंब्यावर उभे आहे. सज्जन शक्तींच्या योगदानातून हे पवित्र कार्य सातत्याने चालू रहावे, यासाठी ‘विद्यार्थी पालकत्व योजना’ चालू करण्यात आली आहे. प्रतिविद्यार्थी १५ सहस्र रक्कम जमा करून कुणीही इच्छुक सज्जन राष्ट्रीय एकात्मतेच्या या कार्यात योगदान देऊ शकतात.
ईशान्य भारतास राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ला सढळ हाताने साहाय्य करा आणि प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभागी व्हा’, असे आवाहन ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे कार्यकारी संचालक श्री. जयवंत कोंडविलकर करतात.

भेट द्या → https://www.facebook.com/psvp.manipur.52/

अनुभवाधारीत शिक्षणाचा भाग म्हणून देशाच्या कानाकोपर्‍यातील परिस्थिती समजून घेण्यासाठी किमान एक वर्ष युवकांनी पूर्व सीमा भागात सेवाकार्य करून राष्ट्र उभारणीच्या कार्याला आणखी सक्षम करावे. अशा इच्छुक युवकांना ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’च्या कार्यात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी श्री. जयवंत कोंडविलकर (९६१९७२०२१२), श्री. श्रीपादजी दाबक (९८६००९५८५१) किंवा प्रा. श्रुति मेहता (९०२८९५०२००) यांच्याशी अवश्य संपर्क साधावा. आपले सदैव स्वागत आहे.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷