ईशान्य भारत आणि राष्ट्रकार्यासमोरील आव्हाने !

ईशान्य भारतामध्ये बंडखोरांचे वर्चस्व असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

कै. भैयाजी काणे

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कै. भैयाजी काणे (शंकर दिनकर काणे) यांनी मणीपूरमध्ये शाळा चालू केली होती. भैयाजींनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महाराष्ट्रात आणायचे ठरवले. ‘हे विद्यार्थी मणीपूरबाहेर गेल्यास त्यांना विश्वातील घडामोडी ज्ञात होतील आणि त्यातून त्यांचे भारताशी असलेले नाते अधिक घट्ट होईल’, असे काणे यांना वाटले; पण विद्यार्थ्यांचे पालक श्री. काणे यांना म्हणाले, ‘‘तुम्ही आमच्या मुलांना एवढ्या दूर घेऊन जाणार आहात. त्यांचे काय होईल, आम्हाला ठाऊक नाही. तुम्ही तुमचा मुलगा येथे ठेवा. तुमचा मुलगा येथे मणीपूरमध्ये शिकत असल्याने आम्हाला निश्चिती होईल. त्यानंतर आमची मुले महाराष्ट्रात शिकायला जातील.’’ काणे यांनी लग्न केलेले नव्हते. त्या काळात त्यांनी जयंत कोंडविलकर या मुलाला दत्तक मानले होते. त्याला ते मणीपूरमध्ये घेऊन गेले. त्यामुळे जयंत यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले. एवढ्या लहान वयात जयंत कोेंडविलकर मणीपूरमध्ये राहून त्यांच्या भाषेत शिकले, हे आश्चर्यकारक आहे.

भैयाजी काणे यांनी मणीपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यांचे कार्य आज जयंत कोंडविलकर पुढे चालवत आहेत. कोंडविलकर यांचे ‘उखरूलचे आव्हान’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. आता त्यांनी ‘ईशान्य वार्ता’ नावाचे मासिक चालू केले आहे. श्री. कोंडविलकर यांच्या शब्दांत श्री. भैयाजी काणे आणि स्वत: कोंडविलकर यांच्या मणीपूरमधील समाजकार्याविषयी जाणून घेऊया.

संकलक : (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

१. श्री. भैयाजी काणे यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य शिक्षणाचा प्रसार आणि समाजसेवा यांच्यासाठी घालवणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

श्री. कोंडविलकर यांनी सांगितले, ‘‘भैयाजींनी सर्वत्रच्या मुलांवर संस्कार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे शिक्षण आणि समाजसेवा यांमध्ये खर्ची पडले. वर्ष १९७० मध्ये कोकणातील रत्नागिरी आणि राजापूर या ठिकाणी काही लोकांनी शाळा काढायचे ठरवले होते. ‘तेथे १ वर्ष राहून भैयाजी यांनी शाळा सुरळीत चालू करून द्यावी’, असा त्या लोकांचा आग्रह होता. त्यानंतर भैय्याजी यांनी मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कोंडीये या गावामध्ये एका शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. त्याच काळात, म्हणजे वर्ष १९७० मध्ये मी इयत्ता ४ थी उत्तीर्ण होऊन कोंडीये येथील शाळेत प्रवेश घेतला होता. तेथेच माझी भैय्याजी यांच्याशी प्रथम भेट झाली.

२. मणीपूरमधील १२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये करणे

वर्ष १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध चालू झाले. तेव्हा त्यांना ‘आपणही सीमाप्रदेशामध्ये जाऊन देशासाठी काहीतरी करावे’, असे वाटले. त्यामुळे ते मणीपूरला आले. ते मलाही समवेत घेऊन गेले. उखरूलपासून २५ किलोमीटरवरील मणीपूर, नागालॅण्ड आणि म्यानमार यांच्या सीमेलगत असलेल्या एका गावात गेलो. तेथे ते १ वर्ष शिक्षक म्हणून राहिले. त्यानंतर वर्ष १९७३ मध्ये ते भारताचे शेवटचे गाव न्यू तुसोम येथे गेले.

३. मणीपूरमध्ये बंडखोरांचे समांतर सरकार असून त्यांचा अधिकार चालणे आणि ‘माणसांच्या हत्या’ ही सामान्य गोष्ट झालेली असणे

मणीपूरमध्ये राहून काम करणे अत्यंत धोकादायक आहे. उद्या आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे, याची चिंता करतच झोपी जायचो. तेथे बंडखोरांचे समांतर सरकार आहे. ते सरकारलाही आदेश देतात. एखाद्या कामाचे कंत्राट कुणाला द्यायचे, तेही बंडखोरच सरकारला सांगतात. तेथे माणसांना सहजपणे मारले जाते. मृत्यूची चौकशीही होत नाही आणि कुणी साक्षीदार म्हणूनही पुढे येत नाही.

४. महाराष्ट्रातून शिकून गेलेल्या मुलांना मणीपूरमधील लोकांकडून कृतीशील प्रतिसाद लाभणे आणि त्यांच्या माध्यमातून ५०० देशभक्त नागरिक मिळणे

‘ईशान्य भारतातील लोकांमध्ये देशाच्या अन्य भागांतील लोकांविषयी पुष्कळ अज्ञान आहे. त्याप्रमाणेच आपल्या लोकांमध्येही त्यांच्याविषयी अज्ञान आहे. त्यामुळे संघर्ष निर्माण होतो’, हे भैयाजी यांनी जाणले. भैयाजी यांनी शिक्षणासाठी ईशान्येतून आणलेल्या विद्यार्थ्यांना पुणे, सांगली, तर काहींना मैसूर (कर्नाटक) येथे ठेवले. त्यामुळे आता ही मुले त्यांच्या भागातील प्रसारदूत झाली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना किंवा समाजाला आपण परप्रांतात आणू शकत नाही. त्यामुळे ईशान्य भारतात शाळा काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांना अन्य राज्यांत पाठवले, काही विद्यार्थ्यांना तेथेच शिकवले, आपल्याकडील काही शिक्षक मणीपूरमध्ये गेले, तर मणीपूरमधील शिक्षकांना आपल्याकडे बोलावून प्रशिक्षण दिले. अशा प्रकारे विविध पद्धतीने प्रयत्न केल्याने आम्हाला पुष्कळ लाभ झाला.

आमच्या शाळांचे ५०० विद्यार्थी विविध संस्थांमध्ये कार्य करतात, तसेच काही नोकरी करत आहेत. आपण समाज आणि राष्ट्र यांसाठी निरपेक्ष भावाने काम केले, तर लोकही आपल्याला चांगला प्रतिसाद देतात, असे लक्षात आले.

आम्ही मुलांना शिकवले. त्यांनी केलेल्या राष्ट्रभक्तीच्या प्रसारामुळे आम्हाला ५०० देशभक्त नागरिक मिळाले.

५. प्रत्येक भारतीय तरुणाने नोकरी करण्यापूर्वी किमान १ वर्ष ईशान्य भागासाठी देण्याचा प्रयत्न करावा !

आपल्याकडील वृत्तपत्रांमध्ये ईशान्येकडील वृत्ते येत नाहीत. त्यामुळे तेथे काय चालू आहे, यांविषयी आपण अनभिज्ञ असतो; म्हणून त्या भागातील राजकीय आणि सामाजिक हालचालींविषयी समाजाला माहिती व्हावी, यासाठी नियतकालिक काढले. ‘ईशान्य भागातील लोकांशी जवळीक वाढण्यास साहाय्य होईल’, हा त्यामागील हेतू होता. शिक्षण झाल्यावर कोणताही तरुण नोकरीच्या शोधात असतो. विवाह करून तो स्थिर होतो. मला वाटते की, हे करण्यापूर्वी प्रत्येक भारतीय तरुणाने किमान १ वर्षतरी अशा भागात कार्य करावे. संपूर्ण आयुष्य नाही दिले, तरी या कालावधीत केलेल्या कार्याचाही तेथील लोकांना पुष्कळ लाभ मिळू शकतो.’’

ईशान्य भारतीय जनता आणि इतर भारतीय यांच्यातील दुरावा दूर करणे, हे भारतियांसमोरील मोठे आव्हान !

ईशान्य भारताची केवळ २ टक्के सीमा ही भारताशी जोडली गेली असून ९८ टक्के सीमा ही चीन, म्यानमार, बांगलादेश आणि भूतान या राष्ट्रांशी जोडली गेली आहे. अशा ईशान्य भागातील मणीपूर हा सर्वांत हिंसक प्रदेश आहे. तेथे बंडखोरी, अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रे यांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. मणीपूरला जाण्यासाठी रेल्वेने ७ – ८ दिवस लागतात. तेथे रहाणे सामान्य गोष्ट नाही. मणीपूरची लोकसंख्या अनुमाने ३० लाख आहे; परंतु तेथे विविध प्रकारचे आतंकवादी गट कार्यरत आहेत. मणीपूरच्या एका राज्यपालांनी एका पुस्तकात लिहिले आहे की, मणीपूरमध्ये एकाच वेळी २ जण राज्य करत असतात. एक सरकार आणि दुसरे तेथील बंडखोर. यावर त्यांचे मुख्य सचिव म्हणाले, ‘‘साहेब, तुमचे विधान चुकीचे आहे. मणीपूरमध्ये भारत किंवा मणीपूर सरकारचे नाही, तर केवळ बंडखोरांचे राज्य आहे.’’

खंडणी वसूल करणे, हा तेथील सर्वांत मोठा उद्योगधंदा आहे. या सगळ्या कठीण परिस्थितीत त्यांचा उर्वरित भारताशी असलेला दुरावा कसा घालवायचा, हे आपल्यासमोर असलेले मोठे आव्हान आहे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

ईशान्य भारतीय लोकांमध्ये जन्मजात लढण्याची वृत्ती असल्याने तेथील तरुणांचा भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात सहभाग असणे

सैन्याने एक धोरण म्हणून ईशान्य भारतातील लोकांना सैन्यात सहभागी करून घेतले. तसेच ईशान्य भारतातून विविध चांगले सैन्याधिकारी निर्माण झाले. ईशान्य भागातील मुलांमध्ये जन्मजात काही गुण आहेत. त्या गुणांचा लाभ सैन्यासाठी होत असतो. पुण्यामध्ये खेळाशी संबंधित असलेली भारतीय सैन्याची ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ आहे. तेथे भारतीय सैन्याच्या अांतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. यातील अर्धे खेळाडू हे मणीपूर आणि नागालॅण्ड येथील आहेत. भारतीय सैन्यातील अर्धे लोक मणीपूर आणि ईशान्य राज्यांमधील आहेत. ते खरोखर चांगले काम करतात. मणिपुरी लोकांना काश्मीरमधील आतंकवादीही घाबरतात; कारण ते चांगले शिकारी आहेत. त्यांच्यात लढण्याची प्रवृत्ती जन्मजात आहे. त्यामुळे त्यांच्या गुणांचा आपण वापर केला पाहिजे, तरच तेथे अधिक चांगली प्रगती होऊ शकेल. त्यांचे फूटबॉल खेळातील कौशल्यही उत्कृष्ट आहे. भारतात फूटबॉल हा खेळ प्रसिद्ध होत आहे. ‘पुणे फूटबॉल क्लब’च्या संघातील अर्धे खेळाडू मणीपूरचे आहेत.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन