डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !

मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे जगातील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजाराची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी १४ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

जयकुमार रावल म्हणाले, ‘‘५५८ हेक्टर क्षेत्रात या कृषी बाजाराचा पहिला टप्पा उभारला जाणार आहे. वाढवण बंदरापासून ४० किलोमीटर अंतरावर हा कृषी बाजार असेल. यामध्ये १२ ते १५ सहस्र जणांना नोकरी उपलब्ध होईल. या कृषी बाजारातून १० बिलियन डॉलर निधीची उलाढाल होईल. या प्रकल्पासाठी सरकारकडून विनामूल्य भूमी प्राप्त होणार आहे. या बाजारातून जगातील विविध देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. आयात-निर्यात यांचे केंद्र, शीतगृहे, ग्रेडिंग आणि पॅकिंग आदीसाठी कृषी बाजाराचा उपयोग होईल. व्यापार वृद्धी, निर्यात वृद्धी, रोजगार निर्मिती, शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ हे कृषी बाजारातून साध्य होईल. या कृषी बाजारामुळे मालाची १५ ते २० टक्के होणार्‍या हानीमध्ये घट होईल. फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मसाले यांसह प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीला चालना मिळेल.’’