
कोल्हापूर – जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंदाचे-उत्साहाचे क्षण यावेत, यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साकडे घातले. ‘राज्यातील सर्व नागरिक आरोग्यसंपन्न, सुखी आणि आनंदी राहू दे’, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पूजन करण्यात आले.
महाराष्ट्र कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा देवाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. गुलालाने न्हाऊन निघालेल्या लाखो भाविकांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगर गुलाबी रंगात अगदी फुलून गेला होता. या वेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांसह अन्य उपस्थित होते.

१२ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता शासकीय अभिषेक पार पडला. दुपारी १२ वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीमध्ये क्रमवारीनुसार पहिला मान सातारा जिल्ह्यातील पाडळी गावाला असतो. या यात्रेत १०८ सासनकाठ्या सहभागी झाल्या आहेत. प्रशासनाकडून डोंगरावर ३० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर लावण्यात आले होते, तर ‘थेट दर्शन’ व्यवस्था करण्यात आली होती.