
मुंबई – ‘ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजने’तील त्रुटी दूर करून येत्या १ मासात योजनेची सुधारित नियमावली सिद्ध करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिले आहेत. याविषयी ९ एप्रिल या दिवशी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत पत्रकारांना कॅशलेस उपचार, शिवनेरीतून विनामूल्य प्रवास यांविषयीही प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांसह गृह विभाग, वित्त विभाग, परिवहन विभाग, गृहनिर्माण विभाग, माहिती आणि जनसंपर्क विभाग, म्हाडा यांचे अधिकारी, तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, उपाध्यक्ष आलोक देशपांडे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव यांसह मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य सर्वश्री खंडूराज गायकवाड, मनोज दुबे, सुजित महामूलकर, प्रशांत बारसिंग आणि राजन शेलार उपस्थित होते.
दिलीप सपाटे यांनी प्रारंभी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांविषयीची माहिती बैठकीत दिली, तसेच योजनांमधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
वार्ताहर संघाने केलेल्या मागण्या !
१. वयाची ६० वर्षाची अट ५८ वर्षे करावी, तर ३० वर्षे पूर्णवेळ पत्रकारितेची अट शिथिल करून २५ वर्षे करावी. २. ज्येष्ठ पत्रकारांकडून अधिक कागदपत्रांची मागणी न करता त्यांच्या अधिस्वीकृतीपत्रिकेचा उपयोग करावा. ३. स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्येही सुधारणा करावी. ४. कल्याण निधीतून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आजारपणात आर्थिक साहाय्य मिळते. त्या आजारांच्या संख्येत वाढ करावी, तसेच यासाठीचे अर्थसाहाय्य ३ लाख रुपयांपर्यंत वाढवावे. ५. अधिस्वीकृतीधारक पत्रकाराच्या निधनानंतर पती किंवा पत्नीला सध्या १ लाख रुपये इतके अर्थसाहाय्य केले जाते. ही रक्कम ३ लाख रुपयांपर्यंत वाढवावी. |