दोडामार्ग : तालुक्यातील मोर्ले येथे ८ एप्रिल या दिवशी सकाळी शेतात गेलेले लक्ष्मण यशवंत गवस (वय ७० वर्षे) यांच्यावर हत्तीने आक्रमण करून त्यांना ठार केले. गवस हे शेतात गेले असता मागून येऊन हत्तीने त्यांना सोंडेत पकडून भूमीवर आपटले अन् पायदळी तुडवले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
तालुक्यात २० वर्षांहून अधिक काळ हत्तींची समस्या आहे. आतापर्यंत हत्तींमुळे जीवित, तसेच वित्त हानी झाली आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी येथील शेतकरी आणि ग्रामस्थ वारंवार करत असतात. त्यानुसार सरकारने काही वेळा मोहीम राबवून प्रयत्न केले; मात्र ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात अद्यापपर्यंत यश आलेले. कर्नाटक राज्यातही ही समस्या आहे. तेथे करण्यात येत असलेले प्रयत्न जाणून घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी, बागायतदार, वन विभागाचे अधिकारी यांच्या पथकाने नुकताच कर्नाटक राज्याचा दौरा केला आहे. ‘गवस यांच्या मृत्यूमुळे सरकार आणि प्रशासन यांना आतातरी जाग येईल का ? आणि हत्ती हटवण्यासाठी मोहीम राबवली जाईल का ?’, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
मोर्ले येथील घटना समजल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पहाणी केली अन् पंचनामा केला.
संपादकीय भूमिकाअजून किती जीवित आणि वित्त हानी झाल्यावर सरकार अन् प्रशासन यांना जाग येणार ? |