‘एखाद्या शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यापूर्वी आधी त्याची चौकशी केली पाहिजे. दुर्भावना न बाळगता केलेल्या शिक्षेसाठी शिक्षकांचा गुन्हेगारी प्रकरणापासून बचाव केला पाहिजे’, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने केरळच्या पोलीस महासंचालकांना यासंबंधी एक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले आणि ते एक महिन्यात लागू करण्याचेही आदेश दिले. ‘एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला हलकेच मारले, धक्का दिला, तर त्यात दुर्भावना नसल्यास ते गुन्ह्याचे प्रकरण ठरणार नाही. त्यास गुन्ह्याच्या श्रेणीत टाकू नये. अन्यथा शिक्षक त्यांचे दायित्व नीटपणे पार पाडू शकणार नाहीत. विद्यार्थी किंवा पालक यांनी शिक्षकाच्या विरुद्ध तक्रार दिल्यास आधी या प्रकरणाची नीटपणे चौकशी करावी, म्हणजेच गुन्हा नोंदवण्यासाठी ठोस आधार आहे किंवा नाही, याचे अन्वेषण केले पाहिजे. शिक्षकांना छडी बाळगण्याची अनुमती असावी. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रहाते. तसे असले तरी छडीचा नेहमी वापर करणे योग्य नाही. शाळेत शिस्त रहावी म्हणून छडी पुरेशी आहे.’ एका प्रकरणात विद्यार्थ्याला काठीने मारल्याचा आरोप शिक्षकावर असून त्यावरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने वरील निर्देश दिले. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी शिक्षक किरकोळ स्वरूपाची शिक्षा करू शकतात, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने वर्ष २०२३ मध्ये दिला होता.
सध्याच्या काळात शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लावण्यात अनेक अडचणी येतात. अनेकदा ते फौजदारी गुन्ह्याच्या भीतीने व्रात्य विद्यार्थ्यांच्या विरोधात पाऊल टाकत नाहीत. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार छडी आवश्यक आहे. वर्ष १९५३ पासून ‘छडी लागे छम छम्, विद्या येई घम घम’, हे बालगीत म्हटले जायचे आणि कृतीतही आणले जायचे. विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची वेळ येते, याचा अर्थ पालक, शिक्षक आणि स्वतः विद्यार्थी यास दोषी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वयंशिस्त पाळणारे, आदरयुक्त भीती बाळगणारे विद्यार्थी निर्माण करणार्या शिक्षणपद्धतीची आज आवश्यकता आहे. शिक्षकाला शिक्षा करण्याची हौस आहे का ? शिक्षा करण्याची वेळ का येते ? पालकांना त्यांच्या पाल्याचे हित कशात आहे, हे कळत नाही का ? आज शिक्षक-विद्यार्थी, शिक्षक-पालक यांचा संबंध केवळ वार्षिक करार केल्यासारखा झाला आहे का ?, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. यावर एकमात्र उपाय आहे आणि तो म्हणजे लॉर्ड मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत मोडीत काढून गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब करणे अन् गुरुकुलाप्रमाणे पालकांनी शिक्षकांवर पूर्ण विश्वास ठेवून पाल्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांना संधी देणे आवश्यक आहे !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव