पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा परवाना रहित करून प्रशासनावर गुन्हे नोंद करावेत !

सांगली येथे मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतांना मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

सांगली, ७ एप्रिल (वार्ता.) – पुणे येथील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिष्का भिसे महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाचा परवाना रहित करून प्रशासनावर गुन्हे नोंद करावेत, या मागणीसाठी येथील मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ एप्रिल या दिवशी निदर्शने करण्यात आली. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष सुरेश टेंगले, अधिवक्ता माणिक तेग्गी, कुमार सावंत, रोहित घुबडे पाटील, अमित पाटील, प्रशांत जमगई, बघिरत राठोड, अमर औरादे, संग्राम पाटणकर, प्रकाश माळी, तोफिक गुराडी आदी उपस्थित होते.

याविषयी मनसेचे शहराध्यक्ष श्री. सुरेश टेंगले म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अनधिकृत कारभारामुळे तनिष्का भिसे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासारख्या घटना केवळ पुणे येथे नव्हे, तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही घडत आहेत. ४ दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज येथे सर्पदंश झालेल्या कावेरी चव्हाण यांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

ते म्हणाले की, या प्रकरणी आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती शेळके यांचे निलंबन करण्यात आले असून विभागीय चौकशीची शिफारस उपसंचालक (आरोग्य सेवा) यांना करण्यात आली आहे. तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदिनी मालेदार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे; पण घटना घडल्यानंतर निलंबन करून उपयोग काय ? असा आमचा प्रश्न प्रशासनास आहे. जिल्हा आणि राज्य प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलावीत, अन्यथा अशा सर्व रुग्णालयांत घुसून मनसे पद्धतीने फोडून काढावे लागेल. या पुढील काळात रुग्णांना तात्काळ सेवा न देणार्‍या आणि रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या शासकीय निमशासकीय अन् खासगी रुग्णालय प्रशासनास मनसेच्या वतीने काळे फासण्यात येईल, याची नोंद जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी घ्यावी, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.