पवना, इंद्रायणी नदीकाठच्या ५६ गावांत ‘एस्.टी.पी.’ प्रकल्पासाठी ८०० कोटींचा निधी संमत ! – खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना


पिंपरी (जिल्हा पुणे)
– पवना आणि इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ५६ गावांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस्.टी.पी.) उभारले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने ८०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
‘पी.एम्.आर्.डी.ए.’ आणि महापालिका अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतल्यानंतर खासदार बारणे पत्रकारांशी बोलत होते. ‘मुळा नदी सुधार प्रकल्प’ राबवतांना आराखड्यात सुधारणा करून ८०० झाडे वाचवली आहेत. त्यात आणखी सुधारणा करून झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, तसेच रस्त्याला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या निकाली काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना त्यांनी दिली. धरणातून पाणी मुबलक मिळूनही महापालिकेने वितरणाचे नियोजन केले नाही. टँकरमाफियांना पोसण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही खासदारांनी केली.