श्री भीमाशंकर ग्रामस्थ रुद्र स्वाहाकार समिती यांचा विश्वकल्याणासाठी उपक्रम !
भीमाशंकर (जिल्हा पुणे) – श्री क्षेत्र भीमाशंकर हे द्वादश जोतिर्लिंगांपैकी एक असून या ठिकाणी शिव-पार्वतीचे वास्तव्य आहे. अशा या महापुण्यकारक क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण विश्वात सुख, समृद्धी आणि शांतता प्राप्त होण्यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान ‘श्री भीमाशंकर ग्रामस्थ रुद्र स्वाहाकार समिती’ने वर्ष १९७९ पासून या कार्यक्रमास प्रारंभ केला असून या वर्षी कार्यक्रमाचे ४७ वे वर्ष आहे. या यज्ञाचा उद्देश समाज आणि राष्ट्र यांच्या एकात्मतेसाठी, तसेच निसर्गाचे संतुलन, विश्वकल्याण आणि मानवाचा आत्मोद्धार यांसाठी आहे.
१४ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत महारुद्र, स्वाहाकार, संतत जलधारा, रुद्राभिषेक, तसेच अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा शिवभक्तांनी लाभ घ्यावा, तसेच या कार्यक्रमासाठी द्रव्य, धान्य रूपाने साहाय्य करावे, अशी समितीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘ज्योतिर्लिंग पुरस्कार’ दिला जातो. या वर्षी हा पुरस्कार तपोनिधी ह.भ.प. गुरुवर्य श्री. माधव महाराज घुले (मठाधिपती जोग महाराज भजनी मंडळ, इगतपुरी (नाशिक)) आणि वेदमूर्ती घनपाठी श्री. प्रकाश नागेशराव दंडगेगुरुजी (पुणे) यांना देण्यात येणार आहे.
श्री. मारुति खळदकर यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे केलेल्या सेवेविषयी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प.पू. बालयोगी गणेशनाथजी महाराज (गोरक्षनाथ मठ, श्री क्षेत्र भीमाशंकर) यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे,
श्री भीमाशंकर ग्रामस्थ रुद्र स्वाहाकार समितीचे अध्यक्ष श्री. मधुकर गवांदे, सहकार्यकारी विश्वस्त, श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान यांच्या हस्ते २१ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता होणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.