म्हापसा येथील भव्य आरोग्य शिबिरात दिली चेतावणी

म्हापसा, १२ एप्रिल (वार्ता.) – गोमंतकियांना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य खाते बांधील आहे. या सुविधा उपलब्ध करून देतांनाच डॉक्टरांनी (आधुनिक वैद्यांनी) नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन ते आत्मसात करणे आवश्यक आहे. जे डॉक्टर आधुनिक पालटापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर निश्चितपणे कडक कारवाई करू आणि संबंधितांना घरी पाठवू, अशी चेतावणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. म्हापसा येथे १२ एप्रिल या दिवशी आयोजित भव्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे बोलत होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला उपसभापती जोशुआ डिसोझा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. आयडा नोरोन्हा आदींची उपस्थिती होती.
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘आरोग्य शिबिरे ही लोकांचे आरोग्य निरोगी रहावे; म्हणून नवीन संकल्पना घेऊन भरवली जात आहेत. माझ्या घरात ज्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या, तशा समस्या इतरांच्या घरी निर्माण होऊ नयेत, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आरोग्याच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न राहील.’’
‘स्टेट केअर’ ही नवीन संकल्पना राबवणार
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘राज्यात पुढील ३ महिन्यांच्या आत ‘स्टेट केअर’ ही नवीन संकल्पना राबवण्यात येणार आहे. याचा लाभ बहुतांश आजारी आणि वयोवृद्ध यांना होणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यभर शिबिरे भरवली जाणार आहेत. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ‘कार्डिओलोजी’ (हृदयरोगाशी संबंधित), ‘युरोलॉजी’ (जननेंद्रियांशी संबंधित) आदी विभाग, तसेच अतीदक्षता विभाग यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ‘१०८’ रुग्णवाहिकांची संख्या १०० वर नेण्याचा प्रयत्न आहे. १० नवीन ‘कार्डियाक रुग्णवाहिका’ सेवेत घेतल्या जाणार आहेत. जुन्या आझिलोचे नूतनीकरण करून ते पूर्ण क्षमतेचे करणार आहे.’