प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे श्रीरामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी सिकंदर भागात असणार्या सालार मसूद गाझी दर्ग्याच्या छतावर चढून काही लोकांनी भगवे झेंडे फडकावले. या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची चौकशी चालू केली आहे. सध्या दर्ग्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सालार मसूद गाझी हा भारतावर आक्रमण करणार्या महंमद गझनी याचा सेनापती होता. त्याच्या नावाने गेल्या अनेक शतकांपासून येथे उत्सव साजरा केला जात होता. यावर्षी पोलिसांनी त्याला अनुमती नाकारली होती.
दर्गा हटवण्यात यावा ! – हिंदूंची मागणी
करणी सेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष मानेंद्र प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी येथे भगवे झेंडे फडकावले. याविषयी मानेंद्र म्हणाले की, सालार मसूद गाझी एक आक्रमक होता. अशा परिस्थितीत प्रयाग या तीर्थक्षेत्रात त्यांचा कोणताही दर्गा असू नये. दर्गा त्वरित पाडला पाहिजे. ते ठिकाण हिंदूंना पूजेसाठी सोपवले पाहिजे.
हिंदु मंदिर बांधावे ! – महाराजा सुहेलदेव सन्मान सुरक्षा मंचाची मागणी
महाराजा सुहेलदेव सन्मान सुरक्षा मंचने दर्ग्याच्या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यात लिहिले आहे की, तीर्थराज प्रयागराजच्या पवित्र भूमीवर बहरियातील सिकंदरा येथे गाजी मियां (सय्यद सालार गाझी) याची अवैध कबर बांधण्यात आली आहे. गाझी हा हिंदूंचा मारेकरी आणि आक्रमणकर्ता होता. सिकंदरा येथे तो कधीच आला नाही. तरीसुद्धा वक्फ बोर्डाने भूमी कह्यात घेण्याच्या उद्देशाने त्याची कबर बांधली. पूर्वी येथे शिवकंद्र वाले महादेव आणि सती बडे पुरूख यांचे मंदिर होते. तेथे पुन्हा मंदिर बांधून भगवान शिवजी, सती आणि बडे परिहारजी यांची पूजा करावी. या गाझीला महाराजा सुहेलदेव यांनी मारले होते; म्हणून त्यांच्या नावाने तिथे एक उद्यानही बांधले पाहिजे.