Jadavpur University Students Protest : विद्यापिठाच्या भिंतीवर १ महिन्यांपासून आहेत ‘आझाद काश्मीर’च्या घोषणा

  • श्रीरामनवमीला अनुमती नाकारणार्‍या जादवपूर विद्यापिठाचा देशद्रोही कारभार !

  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध करत रामनवमीही साजरी!

कोलकाता (बंगाल) – येथील जादवपूर विद्यापिठाच्या परिसरातील भिंतींवर ‘आझाद काश्मीर’ आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ सारख्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. ११ मार्चला लिहिण्यात आलेल्या या घोषणा अद्यापही तशाच आहेत. याचा भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आता निषेध केला  आहे.  विद्यार्थ्यांनी या घोषणांवर भारतीय राष्ट्रध्वज ठेवला आणि ‘शामाप्रसाद मुखर्जी जिथे हुतात्मा झाले, ते काश्मीर आमचे आहे’, ‘जय हिंद’ आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. या वेळी संघटनेकडून विद्यापीठ परिसरात श्रीरामनवमी साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून अनुमती देण्यात आली नव्हती.

१. संघटनेचे कार्यकर्ते असणारे विद्यार्थी निखिल दास म्हणाले की, आज विद्यापीठ परिसरामध्ये पूजा होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. श्रीरामनवमीला येथे श्री रामचंद्रांची पूजा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राम हे मानवतेचे सर्वोत्तम प्रतीक आहेत. आम्ही सर्वांना आमंत्रित केले आहे.

२. निखिल दास पुढे म्हणाले की, विद्यापीठ प्रशासनाकडून इफ्तारसाठी अनुमती दिली जाते; पण श्रीरामनवमीसाठी नाही. ‘फ्री काश्मीर’, ‘फ्री मणीपूर’ यांसारख्या घोषणा लिहिण्यास अनुमती दिली जाते; पण पूजेसाठी अनुमती दिली जात नाही. हे चुकीचे आहे. तरीही आम्ही पूजा आयोजित केली. विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेदेखील सहभागी आहेत. आम्ही सर्व जण एकत्र येऊन श्रीरामनवमी साजरी करत आहोत आणि फार आनंदी आहोत.

३. गणित विभागातील प्राध्यापक बुधदेव एस्. यांनीही या विषयावर मत मांडले. ते म्हणाले की, विद्यापिठाने पूजेला अनुमती दिली कि नाही ?, हे मला ठाऊक नाही. जर त्यांनी नकार दिला असेल, तर तो योग्य नाही. येथे श्रीकृष्णाची पूजा केली जाते; मग श्रीरामनवमी पूजा का करू नये ? जर प्रशासनाने नकार दिला असेल, तर त्यामागे काही तरी कारण असेल. जर विद्यापिठाने ‘कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत’ असे धोरण आखले असेल, तर ते ठीक आहे; पण इफ्तारला अनुमती असतांना श्रीरामनवमी थांबवणे चुकीचे आहे. हा भेदभाव का ?

विद्यार्थी सोमसूर्य बॅनर्जी

४. विद्यार्थी सोमसूर्य बॅनर्जी यांनी म्हटले की, आमचा संदेश स्पष्ट आहे ‘आझाद कश्मीर’ असे काही नाही. ही एक मिथक आहे. जोपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी आणि लोक आहेत, तोपर्यंत काश्मीर भारतापासून वेगळे होणार नाही.

संपादकीय भूमिका

  • विद्यापीठ प्रशासन श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती नाकारते; मात्र इफ्तारला अनुमती देते, तसेच विद्यापिठाच्या भिंतींवर देशद्रोही घोषणा लिहिण्यासही अनुमती देते का ?, असा प्रश्न आता उपस्थित होतो !
  • देहलीतील जे.एन्.यू, उत्तरप्रदेशमधील अलिगड मुस्लिम विद्यापीठ, कोलकात्यातील जादवपूर विद्यापीठ अशा एकापाठोपाठ एक मोठ्या विद्यापिठांतून सातत्याने देशद्रोह जोपासला जात असतांना अशा विद्यापिठांना टाळे ठोकले जाणे सोडाच; पण त्यांना सरकारी अनुदान दिले जाते, हे लक्षात घ्या !