‘२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत (नवरात्रीत) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या ‘देवी होमा’त महर्षींनी प्रतिदिन ‘श्री हंसवाहिनी, म्हणजे श्री सरस्वतीदेवी’चे स्मरण करण्यास सांगितले होते, तसेच ‘देवी होमा’त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांना प्रतिदिन संगीत सेवा (गायन आणि वादन) प्रस्तुत करण्यास सांगितले होते. या संदर्भात सूक्ष्म ज्ञानातून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या देवघरातील अन्य देवतांच्या चित्रांच्या तुलनेत श्री सरस्वतीदेवीच्या चित्रात सकारात्मक ऊर्जा सर्वात अल्प असणे

‘मार्च २०२२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या देवघरात विविध देवतांची चित्रे विविध प्रकारे ठेवून त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाने चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या देवघरातील अन्य देवतांच्या चित्रांच्या तुलनेत श्री सरस्वतीदेवीच्या चित्रात सकारात्मक ऊर्जा सर्वांत अल्प प्रमाणात आढळली होती.
२. सूक्ष्म ज्ञानात ‘समष्टीकडून श्री सरस्वतीदेवीची उपासना अल्प प्रमाणात केली जाणे’ आणि ‘काळ आलेला नसल्याने श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व प्रगट न होणे’, अशी २ कारणे लक्षात येणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या देवघरातील अन्य देवतांच्या चित्रांच्या तुलनेत श्री सरस्वतीदेवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा सर्वांत अल्प का आहे ?’, या प्रश्नाच्या सूक्ष्म ज्ञानातून मिळालेल्या उत्तरात २ प्रधान कारणे मिळाली होती. पहिल्या उत्तरात ‘श्री सरस्वतीदेवीची उपासना समष्टीकडून अल्प प्रमाणात केली जाणे’ आणि दुसर्या उत्तरात ‘काळ आलेला नसल्याने श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व प्रगट न होणे’, ही २ कारणे माझ्या लक्षात आली.

३. महर्षींनी याग आणि विविध कार्यक्रम या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांकडून गायन सेवा करवून घेऊन समष्टीकडून श्री सरस्वतीदेवीची उपासना करून घेणे अन् त्याचे समष्टीला झालेले आध्यात्मिक लाभ
३ अ. मार्च २०२२ नंतर महर्षींनी साधकांकडून करून घेतलेली श्री सरस्वतीदेवीची उपासना
१. वर्ष २०२२ मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षींच्या आज्ञेने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पाद्यपूजन केले. हा सोहळा समाप्त होत असतांना पूर्वनियोजित नसतांनाही महर्षींनी तिथे उपस्थित असलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांना श्री सरस्वतीदेवीच्या संदर्भातील भक्तीगीताचे गायन करायला सांगितले.
२. गुरुपौर्णिमेनंतर महर्षींनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री हंसवाहिनी, म्हणजे श्री सरस्वतीदेवी’साठी दोन दिवस याग करायला सांगितले.
३. २६.९.२०२२ पासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या ‘देवी होमा’मध्ये उपस्थित असलेल्या सर्व साधकांना महर्षींनी प्रतिदिन ‘हंसवाहिनी, म्हणजे सरस्वतीदेवी’चे स्मरण करण्यास सांगितले. याच प्रकारे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होणार्या देवी होमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांना प्रतिदिन संगीत सेवा (गायन आणि वादन) प्रस्तुत करण्यास सांगितली आहे.
वरील घटनाक्रमातून लक्षात येते की, विविध प्रकारे महर्षि समष्टीकडून सरस्वतीदेवीची उपासना करवून घेत आहेत.
३ आ. महर्षींनी साधकांना श्री सरस्वतीदेवीच्या ‘हंसवाहिनी (हंसावर आसनस्थ सरस्वतीदेवी)’ रूपाचे स्मरण करण्यास सांगण्यामागील शास्त्र
३ आ १. समष्टीला सर्वाधिक प्रमाणात सात्त्विकता, पवित्रता आणि ज्ञान ग्रहण होण्यासाठी महर्षींनी साधकांना श्री सरस्वतीदेवीच्या ‘हंसवाहिनी’ रूपाचे स्मरण करण्यास सांगणे : प्रत्येक उच्च देवता विशिष्ट काळात शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या स्तरांवर कार्य करते. हिंदु धर्मात देवतांमधील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या प्रगटीकरणानुसार देवतांना विविध नावे देण्यात आली आहेत, उदा. श्रीकृष्णाच्या ‘गोपाल (गायींची सेवा करणारा आणि त्यांचे पालन करणारा)’ या नावातून सर्वाधिक तारक चैतन्य प्रक्षेपित होते. ‘आनंदकंद (भरभरून आनंद देणारा)’ या नावातून सर्वाधिक आनंदाचे, तर ‘राधाकृष्ण’ या नावातून सर्वाधिक भक्तीची स्पंदने प्रक्षेपित होतात. याच प्रकारे सरस्वतीदेवीच्या ‘हंसवाहिनी (हंसावर आसनस्थ)’ रूपातून समष्टीसाठी सर्वाधिक सात्त्विकता, पवित्रता आणि ज्ञान प्रक्षेपित होते. सरस्वतीदेवीचे हे रूप स्थिरतेचे प्रतीक आहे. यामुळे समष्टीला सर्वाधिक प्रमाणात सात्त्विकता, पवित्रता आणि ज्ञान ग्रहण होण्यासाठी महर्षींनी साधकांना सरस्वतीदेवीच्या ‘हंसवाहिनी’ रूपाचे स्मरण करण्यास सांगितले आहे.
३ आ २. श्वासोच्छ्वासात सात्त्विकता प्रवाहित करण्यासाठी : आध्यात्मिकदृष्ट्या नि:श्वासात ‘हं’ आणि श्वासात ‘स’ ध्वनी ऐकू येतो. (अधोरेखित वाक्याचा संदर्भ – संकेतस्थळ) हंस हा श्वासोच्छ्वासाचे प्रतीक आहे, तर देवी सरस्वती ही सात्त्विकता आणि पवित्रता यांचे प्रतीक आहे. हंसावर देवी आरूढ होणे, हे व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासात सात्त्विकता प्रवाहित होण्याची, म्हणजे उच्च आध्यात्मिक स्थिती दाखवते. या स्थितीत समष्टीला नेण्यासाठी, म्हणजे त्यांची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी महर्षींनी साधकांना सरस्वतीदेवीच्या ‘हंसवाहिनी’ रूपाचे स्मरण करण्यास सांगितले आहे.
३ इ. याग आणि विविध कार्यक्रम या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांनी प्रस्तुत केलेल्या गायन सेवेचे झालेले सूक्ष्मस्तरीय परिणाम
३ इ १. कार्यक्रमाच्या वेळी निर्माण झालेले उच्च तत्त्व आणि सात्त्विकता समष्टीत अधिक प्रमाणात प्रक्षेपित होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे सनातनचे तिन्ही समष्टी गुरु आता निर्गुण आणि निर्गुण-सगुण स्थितीत असतात. यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होणार्या कार्यक्रमांमध्ये निर्गुण तत्त्व, तसेच उच्च कोटीची सात्त्विकता कार्यरत असते. या उच्च तत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित समष्टीला सर्वाधिक, तर प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या समष्टीला तुलनेत अल्प प्रमाणात लाभ होतो. गायन हे आकाशतत्त्वाशी निगडित आहे. यामुळे अशा कार्यक्रमांच्या वेळी गायन सेवा केल्यावर उच्च तत्त्वात वाढ होऊन ते गायनाच्या माध्यमातून सर्वत्रच्या समष्टीसाठी प्रक्षेपित होते. यामुळे कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या; पण भाव असलेल्या समष्टीलाही त्या तत्त्वाचा लाभ होऊन वेगवेगळ्या अनुभूतीही येतात.
३ इ २. यज्ञात निर्माण झालेली मारक शक्ती गायनसेवेमुळे शीघ्र शांत होणे : समष्टीचे आध्यात्मिक त्रास नष्ट करण्यासाठी यज्ञाच्या माध्यमातून मारक शक्ती अनेक वेळा प्रगट होते. या मारक शक्तीचा परिणाम यज्ञ संपल्यावरही वायूमंडलात, तसेच वाईट शक्तींचे त्रास नसलेले साधक आणि संत यांवरही टिकून रहातो. यामुळे वाईट शक्तींचा त्रास नसलेले साधक आणि संत यांना काही काळ किंवा रात्रभर सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याची अनुभूती येते. या स्थितीमुळे संतांना परत निर्गुणात जाता येत नाही, तर वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या साधकांना मारक शक्ती सहन न झाल्यास पुढच्या समष्टी सेवा करणे कठीण होते. यज्ञानंतर केल्या जाणार्या गायनसेवेमुळे आकाशतत्त्व कार्यरत होते. आकाशतत्त्व म्हणजे पोकळी. या पोकळीतून वायूमंडल आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेले साधक अन् संत यांमध्ये टिकून राहिलेले मारक तत्त्व टिकून न रहाता निर्गुणात जाते आणि त्या ठिकाणी तारक तत्त्व प्रगटते. थोडक्यात गायनसेवेमुळे यज्ञात निर्माण झालेली मारक शक्ती शीघ्र गतीने शांत होते. गायनसेवेत आकाशतत्त्व, म्हणजे उच्च स्तराची शक्ती कार्यरत असल्याने त्याचा परिणाम वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांवर होऊन त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतो.
वरील सूक्ष्म ज्ञानातून ‘महर्षि समष्टीसाठी सांगत असलेली प्रत्येक कृती करण्याचे किती आध्यात्मिक महत्त्व आहे !’, हे लक्षात येते. महर्षि समष्टीवर करत असलेल्या या कृपेसाठी महर्षि अन् सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (२९.९.२०२२, संध्याकाळी ६.१५)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |