Gurdaspur Pastor Accused Of Rape : गुरुदासपूर (पंजाब) येथे पाद्री जशन गिल याच्याकडून तरुणीवर बलात्कार

  • गर्भपातानंतर तरुणीचा मृत्यू

  • पोलिसांकडून अद्याप पाद्रीवर कारवाई नाही  

पाद्री जशन गिल

गुरुदासपूर (पंजाब) – पाद्री जशन गिल याच्यावर २२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पाद्री गिल गुरुदासपूरचा रहिवासी आहे. मृत पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, गिल याने त्यांच्या मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. संसर्गामुळे उपचाराच्या वेळी मुलीचा मृत्यू झाला.  काही दिवसांपूर्वी मोहाली न्यायालयाने पाद्री बजिंदर सिंह याला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मृत पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, ते त्यांच्या कुटुंबासह गुरुदासपूर जिल्ह्यातील अबुल खैर गावातील एका चर्चमध्ये जात होते. त्या चर्चमध्ये जशन गिल नावाचा एक पाद्री होता. त्याने त्यांच्या मुलीची दिशाभूल केली, तसेच तिला फूस लावून तिच्यावर बलात्कार केला. त्या वेळी त्यांची मुलगी २२ वर्षांची होती. पाद्री गिल याने मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. यामुळे ती गर्भवती राहिली. जेव्हा पाद्री गिल याला हे कळले, तेव्हा त्याने खोखर गावातील कुलवंत कौर नावाच्या परिचारिकेकडून तिचा गर्भपात करून घेतला. या परिचारिकेने निष्काळजीपणे गर्भपात केला. त्यामुळे मुलीला संसर्ग होऊन तिचा मृत्यू झाला.

पैसे घेऊन पोलीस पाद्रीवर कारवाई करण्याचे टाळत असल्याचा मृती पीडितेच्या वडिलांचा आरोप !

वडिलांच्या म्हणण्यानुसार, सत्य उघड झाल्यानंतरही गुरुदासपूर पोलिसांनी पाद्री जशन गिल याला अटक केली नाही. तो मुक्तपणे फिरत असून पोलीस त्याच्याकडून पैसे घेत आहेत, असा आरोप केला. गुन्ह्याची घटना वर्ष २०२३ मध्ये घडली होती; पण गेल्या २ वर्षांत त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट आम्हाला धमकी मिळू लागल्याने आम्हाला गाव सोडून पळून जावे लागले.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मृत पीडितेच्या कुटुंबाने केली आहे. यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय यात याचिकाही प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. पाद्री गिल याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पसार आहे.

संपादकीय भूमिका

जे विदेशात पाद्र्यांकडून केले जात होते, ते भारतही होत आहे. याविषयी भारतात चित्रपट निघतील का ? कि अजूनही त्यांना सभ्य आणि संस्कृत, असेच दाखवण्यात येणार आहे ?