तात्काळ कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

सकल हिंदु समाजाचे निवेदन
कोल्हापूर, ५ एप्रिल (वार्ता.) – सध्या कोल्हापूर शहरात विविध चौकांमध्ये, रस्त्याच्या कडेला, गल्लीबोळात सरबत, फळांचे रस, तसेच इतर शीतपेयांच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत व्यवसायधारक त्यांचे व्यवसाय करत आहेत. यामुळे केवळ वाहतुकीस अडथळा होतो, असे नाही, तर नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण होत आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारात मृतदेहासाठी वापरलेला बर्फ बाहेर टाकला होता. हा बर्फ काही अनधिकृत विक्रेत्यांनी त्यांच्या व्यवसायात वापल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला होता. तरी कोल्हापूर शहरातील अनधिकृत शीतपेये, तसेच अवैध हातगाड्या यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने कोल्हापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले. (अशा प्रकारांकडे प्रशासनाचे लक्ष कसे नाही ? – संपादक)
निवेदनानंतर अतिरिक्त आयुक्त यांनी ‘अतिक्रमणाच्या संदर्भात तात्काळ कठोर पावले उचला, अवैध हातगाडे जप्त करा, शहरातील सर्वच धार्मिक स्थळांच्या परिसरात असणार्या हातगाड्यांना तात्काळ नोटीस द्या, आरोग्य विभागाने शहरात तातडीने पडताळणी करावी, आवश्यक तिथे पोलिसांचे साहाय्य घेऊन कारवाई करावी’, अशा सूचना संबंधित अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांना दिल्या.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे आणि श्री. सुहास चव्हाण, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, श्री. विकास जाधव, श्री. विशाल पाटील, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजीत पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ यांसह अन्य उपस्थित होते.