Batala Encounter : बटाला (पंजाब) : पोलिसांसमवेतच्या चकमकीत १ आतंकवादी ठार !

पंजाबमध्ये कार्यरत पाकपुरस्कृत ‘बब्बर खालसा’ आतंकवादी गटाचा पर्दाफाश !

चंडीगड – पंजाब पोलिसांनी गुरदासपूर जिल्ह्यातील बटाला येथे मोठी कारवाई करत जैंतीपूर आणि रायमल बाँबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मोहितला ठार मारले. २७ फेब्रुवारीला उशिरा झालेल्या या चकमकीत पोलीस आणि मोहित यांच्यात गोळीबार झाला. यामध्ये एक पोलीस अधिकारीही घायाळ झाला आहे. बटालामधील जंतीपूर, तसेच रायमल येथे अनुक्रमे १५ जानेवारी आणि १७ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या बाँबस्फोटांचा तपास करत असतांना पोलिसांनी पाकची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ समर्थित ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (बीकेआय) या आतंकवादी संघटनेच्या टोळीचा शोध लावला. हा गट पाकमधील आतंकवादी हरविंदर रिंडा आणि अमेरिकेतील आतंकवादी हॅपी पसिया चालवत होते. या टोळीतील आतंकवादी बटाला येथील मोहित आणि बसरपुरा येथील विशाल यांना अटक करण्यात आली होती.

१. बटाला पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता मोहितने एका निर्जन ठिकाणी शस्त्रे आणि दारूगोळा लपवल्याचे उघड केले. पोलीस त्याला तेथे घेऊन जात असतांना मोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मोहित घायाळ झाला. त्याला रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.

२. या बाँबस्फोट प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींची ओळख पटली आहे. त्यांना अटक करण्यासाठी कारवाई चालू आहे, असे बटाला पोलिसांनी सांगितले.