Eid Animal Sacrifice : मुसलमान देश मोरक्कोत ‘बकरी ईद’ला कुर्बानी (बळी) न देण्याचे आवाहन !

गेल्या ७ वर्षांपासून दुष्कळ पडत असल्याने उचलले पाऊल

मोरोक्कोचे राजा महंमद सहावे

रबात (मोरक्को) – उत्तर आफ्रिकेतील इस्लामी देश मोरक्कोने यंदाच्या बकरी ईदच्या सणाला बकर्‍यांचा बळी देण्यात येऊ नये, असे मुसलमान जनतेला आवाहन केले आहे. मोरोक्कोचे राजा महंमद सहावे यांनी ‘ईद उल-अजहा’, म्हणजेच बकरी ईद या मुसलमानांच्या सर्वांत मोठ्या सणाच्या अनुषंगाने स्वत:हून जनतेला हे आवाहन केले आहे.

१. मोरक्कोचे धार्मिक व्यवहार मंत्री अहमद तौफीक यांनी महंमद सहावे यांचा संदेश तेथील दूरचित्रवाणीवर वाचून दाखवला. त्यात त्यांनी म्हटले की, गेल्या ७ वर्षांपासून देशात दुष्काळ चालू आहे. त्यामुळे गुरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये ही संख्या तब्बल ३८ टक्क्यांनी अल्प झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा ५३ टक्के अल्प पाऊस पडला. चरण्यायोग्य कुरणाच्या प्रमाणात प्रचंड घट झाल्याने जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळेच एकूण परिस्थिती पहाता ‘बकरी ईद’च्या दिवशी कुर्बानी देऊ नका, असे आवाहन करत आहोत.

२. मोरक्कोत मांसाहारी पदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. मूल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोरक्कोने ऑस्ट्रेलियासमवेत करार केला आहे. यांतर्गत मोरक्को ऑस्ट्रेलियामधून तब्बल एक लाख जनावरांची आयात करणार आहे. यांमध्ये शेळ्या, उंट, मेंढ्या अशा प्राण्यांचा समावेश असणार आहे.

संपादकीय भूमिका 

९९.७ टक्के मुसलमान लोकसंख्या आणि इस्लाम अधिकृत धर्म असलेल्या मोरक्कोने केलेले आवाहन तेथील जनता मान्य करेलही ! प्रश्‍न असा आहे की, जर धर्मनिरपेक्ष भारतात असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले, तर येथील मुसलमान आणि काँग्रेस ते स्वीकारील का ?