
यंदाचा महाकुंभमेळा १४४ वर्षांनंतर दुर्मिळ योगावर आला असल्यामुळे सर्वत्रचे लोक अमृतस्नान करण्यासाठी प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तुटून पडत आहेत. त्यांना गर्दीचे भानच नाही.
२९ जानेवारी या दिवशी मौनी अमावास्येला झालेली चेंगराचेंगरी असो, आता देहली येथे रेल्वेस्थानकावर महाकुंभसाठी प्रयागराज येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांची झालेली चेंगराचेंगरी असो, यात मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांची बातमी ऐकून मनाला वेदना, दु:ख झाल्याविना रहात नाही. या प्रकरणात दोष भाविकांचाच आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ते काय ? शासन, प्रशासन यांच्याकडून महाकुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होऊनसुद्धा दुर्घटना होतात आणि या दुर्घटनेला दोषी ठरवण्यातही चढाओढ पहायला मिळत आहे.

महाकुंभपर्व दुर्लभ योग आहे, हे जरी मान्य केले, तरी भाविकांनी गर्दी न्यून झाल्यानंतर नियोजन करून संगमात स्नान करायला जाता येईल; कारण लाभ नक्कीच मिळणार आहे, असे वाटते. भगवंताची ओढ असेल आणि आपण ‘मी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमात स्नान करत आहे’, असा भाव ठेवून घरी जर सर्व नद्यांचे स्मरण करत स्नान केल्यास नक्कीच आनंद अनुभवायला मिळणार आहे.
चेंगराचेंगरीच्या प्रकरणाचा अपलाभ काही हिंदु धर्मविरोधक राजकारणी घेत असतात आणि ते अशी संधी शोधतच असतात. असे राजकारणी हे जन्माने हिंदू असतात; मात्र कर्माने निधर्मी असतात. धर्मबुडवे असतात. त्यांना धर्माचा अभिमान नसतो. आपल्या सनातन धर्माचे रक्षण आपल्यालाच करायचे आहे.
– श्री. अशोक लक्ष्मण रेणके, पाटणतळी, फोंडा, गोवा. (१७.२.२०२५)