सध्या देहली येथे चालू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…
२१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्याचे मूळ मराठी भाषा आहे. भाषा टिकली, तर साहित्य टिकणार आहे. मागील वर्षी मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा’ मिळाल्यानंतर आता या वर्षी ३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालयांतील सर्व व्यवहार मराठीत करण्याचा निर्णय झाला. यामुळे मराठीच्या संवर्धनाला मोठी गती मिळणार आहे. कुठे तरी मराठी भाषेची ‘अनिवार्यता’ कार्यान्वित होण्यासाठी चालना मिळणार आहे. शासन या संदर्भात कसे प्रयत्न करते, हे पहाणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. जनतेनेही या कामी शासनाला पूर्ण सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाचा भाषाभिमान पुरेसा जागृत असेल, तरच मराठी भाषेचे संवर्धन शक्य होईल. राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयीचा अभिमानच भाषाभिमान जागृत ठेवू शकतो. सध्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत असलेले छत्रपती संभाजी महाराज हे याचे सर्वाेत्तम उदाहरण होय.
१. मराठी माणसाने मातृभाषेचे महत्त्व समजणे महत्त्वाचे !
अ. मानवाच्या जीवनातील मातृभाषेचे महत्त्व प्रत्येकाने वैचारिक आणि बौद्धिक दृष्ट्या समजून घेतले पाहिजे.
आ. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलांचा वैचारिक विकास चांगला होतो. त्यांची ऊर्जा वाचते आणि ती अन्य सृजनात्मक कार्यासाठी वापरता येऊ शकते, हे शास्त्र समजून घेतले पाहिजे.
इ. पाल्य परत मराठी शाळांमध्ये कसा जाईल, यासाठी मराठी पालकांनीच पुढाकार घेणे आणि निश्चय करणे, ही काळाची आवश्यकता आहे. अन्यथा ‘मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे’, ही गोष्टही कदाचित अमेरिकेतून भारतात आल्यावर येथील लोकांना पटेल.
ई. भारतात भाषांनुसार राज्याची प्रांतरचना केली आहे. यातून प्रत्येक राज्याच्या (म्हणजे त्या त्या राज्यातील लोकांच्या मातृ) भाषेचे महत्त्व लक्षात येईल.
उ. १०० वर्षांपूर्वी मराठी माणूस महाराष्ट्रात ९५ टक्के टक्के होता आणि असेच चालू राहिले, तर वर्ष २०५० पर्यंत मराठी माणसांची संख्या ६० टक्क्यांच्या खाली जाईल, असे म्हटले जाते. अशा वेळी मराठी माणसांवर मराठी टिकवण्याचे दायित्व वाढते.

२. मराठीच्या सात्त्विकतेचा लाभ घेण्याचे महत्त्व समजून घेणे अनिवार्य !
संस्कृतच्या खालोखाल मराठी सर्वाधिक सात्त्विक भाषा असल्याचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. मराठी लिपी देवनागरी, म्हणजे सात्त्विक असल्याने त्यातील सात्त्विकतेचा लाभ मराठी बोलणार्याला आणि लिहिणार्याला होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. सात्त्विक जीवनशैलीचा पुरस्कार आणि अंगीकार करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.
३. मराठी भाषा टिकली, तर संस्कृती टिकणार आहे, हे समजून घेतले पाहिजे !
‘आमची जगाबरोबर व्यापार करण्याची भाषा भले असेल इंग्रजी; पण मन असेल मराठी ! इंग्रजीची खिडकी असेल; पण डोळे असतील मराठी’, असे काही जण म्हणतात; परंतु मराठी डोळे आणि मन जपण्यासाठी, म्हणजेच मराठी संस्कृती जपण्यासाठी ती टिकली तर पाहिजे ना ? भाषा जर बोलली, तर ती टिकणार आहे. इंग्रजीच्या प्रभावाने मराठी माणूसच आंग्लांळलेला झाला, तर मराठी माणसाचा मूळ पिंड असणारी लढाऊ वृत्ती किंवा राष्ट्र-धर्म यांच्याविषयीचा अभिमान कुठून टिकेल ? ‘भाषा संपली, तर एक इतिहास संपतो. त्या भाषेतील ज्ञान हरवून जाते. भाषा संपली, तर एक संस्कृती संपते. शेकडो, सहस्रो वर्षांची एक परंपरा संपते. एका मोठ्या समाजाची ओळख हरवते. कित्येक पिढ्यांनी जमा केलेले संचित नष्ट होते. त्या भाषेतील साहित्य, कला, संगीत, म्हणी, चालीरिती, खेळ, खाद्य-पदार्थ हे सारे संपून जाते’, असे एका संकेतस्थळावर म्हटले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. भारतीय संस्कृती जगातील जीवन जगण्याचा सर्वाेत्तम मार्ग असल्याने ती टिकणे आवश्यक आहे.
४. स्वाभिमान जागृत झाला, तरच मराठीच्या संवर्धनाला गती येईल !
‘एका आक्रमक राष्ट्राने दुसर्या राष्ट्रावर त्याची सत्ता लादल्यावर होणारा भाषिक संघर्ष प्रायः बलात्कारस्वरूप असतो. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जीत (हरलेल्या) राष्ट्राचा स्वाभिमान जागृत करावा लागतो’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले आहे. हे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महत्प्रयासाने केले; कारण त्या वेळी त्यांनी शोधलेले काही शब्द काही जणांना पुष्कळ कठीण वाटले. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली; परंतु काळाच्या ओघात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले अनेक शब्द आपण अगदी सहजतेने वापरतो; उदा. ‘उच्चांक’, ‘दिनांक’. हे त्यांपैकीच काही शब्द आहेत. यात आपल्याला काहीच अवघड वाटत नाही. आजही परकीय संस्कृतीचा प्रभाव असल्याने स्वाभिमान जागृत करण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागणार आहे. कुठल्याही शब्दांचा वापर व्यवहारात, बोलण्यात, लिहिण्यात वाढला, तर त्यात काहीच अवघड वाटत नाही. हेच भाषेत स्वभाषेतील नवीन शब्द रुजवण्यामागचे आणि त्या माध्यमातून भाषावृद्धी करण्यामागचे खरे गमक आहे !
५. जिथे शक्य आहे, तिथे आवर्जून पूर्ण वाक्य मराठीत बोला !
अ. ‘अन्य भाषांतील शब्द वापरल्याने भाषा समृद्ध होते’, हा समज शासकीय स्तरावर आणि शैक्षणिक, तसेच विद्यापिठाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे भाषा वाढत नसून ती संकुचित होण्याचा धोकाच अधिक आहे, हे आपण मागील लेखात पाहिले.
आ. मराठी माणसाने एकमेकांशी बोलतांना एकमेकांना जाणीव करून देऊन जिथे शक्य आहे, तिथे ‘पूर्ण मराठी वाक्य बोलण्याचे’ दायित्व पार पाडले पाहिजे. त्यासाठी एकमेकांना साहाय्य केले पाहिजे.
६. मराठी माणूस मराठीच्या संवर्धनासाठी काय करू शकतो ?
अ. वैयक्तिक नोंदी, हिशोब करणे, संगणक किंवा भ्रमणभाष यांवर लिहिणे, शासकीय कामकाजाच्या संदर्भातील देवाणघेवाण, कला सादर करणे, शुभेच्छा देणे आदी गोष्टी आवर्जून शक्य तेवढ्या पूर्ण मराठीत केल्या पाहिजेत.
आ. परभाषिक रुळलेले शब्द तोंडातून जाण्यासाठी अस्सल मराठी शब्दांचा आवर्जून आणि बंधनकारक वापर करायला हवा. प्रतिदिनच्या वापरातील शब्द आग्रहाने मराठीत बोलण्यासाठी प्रत्येक मराठीजनाने प्रयत्नरत असले पाहिजे; उदा. शीतकपाट, दूरदर्शन, संगणक, भ्रमणभाष.
इ. गरज ही शोधाची जननी असते. मराठी शब्दांचा वापर करण्याची तळमळ असेल, तर मराठी शब्द सिद्ध होतील, निर्मिले जातील, प्रसवतील, सुचतील. कदाचित काहींना ब्रशला ‘दंतघासणी’ म्हणणे रुचणार नाही; त्यासाठी अधिक समर्पक शब्द शोधून काढू शकतो.
ई. खण, दैनिक, पेला, पलंग हे साधे शब्दही वापरले जात नाहीत.
उ. मराठी प्रतिशब्द आणि नंतर मराठी शुद्धलेखन अशा दोन्ही स्तरांवर हे प्रयत्न झाले पाहिजेत.
ऊ. स्वतः प्रेरित होऊन कृती करणे आणि इतरांना प्रेरित करणे, या दोन्ही स्तरांवर प्रयत्न केले पाहिजेत.
७. मुंबईत मराठी माणसाने घराबाहेरही मराठीतच बोलावे !
मुंबईत अन्य भाषिक आणि व्यापारी आल्यावर ते मराठी अल्प प्रमाणात शिकले; परंतु तुलनेत मराठी माणसाने तात्काळ हिंदीत बोलायला आरंभ केला. मुंबईतील मराठी माणूस घराबाहेर पडला की, तो ‘हिंदी’ होतो आणि कार्यालयात गेला की, ‘इंग्रजी’ होतो अन् कुटुंबात आल्यावर सर्व मिश्रित भाषा बोलतो. बस आणि रेल्वे येथे, टॅक्सी आणि रिक्शा चालक, भाजी आणि फळ वाला, रस्त्यावर सर्व प्रकारची खरेदी करतांना, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर, इस्त्रीवाला, दूधवाला, गुरखा, धोबी या सार्यांशी मराठी माणूस अगदी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे हिंदीत बोलतो. अगदी अल्प शिकलेला मराठी माणूसही नैसर्गिकरित्या हिंदीतूनच आरंभ करतो. प्रत्येक मराठी माणसाने दाराच्या बाहेर पडल्यावर प्रत्येकाने कटाक्षाने पूर्ण मराठीत बोलण्याचा निश्चय केला पाहिजे.
८. संघटनात्मक आणि संस्थास्तरावर प्रयत्न हवेत !
अ. सामाजिक, सांस्कृतिक संस्था, मंडळे, संघटना यांनी यात महत्त्वाचा वाटा उचलला पाहिजे. शुद्ध मराठी बोलण्यासाठी ते शिबिरे घेऊ शकतात. सामाजिक माध्यमांचा वापर करून अभियान उभारू शकतात. मराठीचा अधिकाधिक वापर होण्यासाठी विविध उपक्रम राबवू शकतात.
आ. मराठी भाषेसाठी काम करणार्या शासकीय संस्थांसमवेत खासगी संस्था विविध उपक्रम राबवू शकतात.
९. प्रसारमाध्यमांनी त्यांचे कर्तव्य निभवावे !
अ. महाराष्ट्रात मायबाप मराठी प्रेक्षक आहेत, म्हणून मराठी वाहिन्या पाहिल्या जातात. त्यांनीही मराठी भाषेविषयीचे त्यांचे कर्तव्य म्हणून वृत्तपत्रांप्रमाणे त्यांच्या मालिकांमध्ये अधिकाधिक मराठी शब्दांचा वापर करण्यासाठी लेखक-निर्माते यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. वृत्तवाहिन्यांनीही शुद्ध मराठी, मराठी शब्दांचा अधिकाधिक वापर असणारी मराठी भाषा कशी सादर केली जाईल ?, याकडे लक्ष दिले पाहिजे. वाहिन्या आणि विज्ञापने ही अद्यापही प्रभावशाली माध्यमे असल्याने त्यातून इंग्रजीचा अत्यल्प वापर कसा होईल ?, हे पाहिले पाहिजे.
आ. सृजनशीलतेच्या नावाखाली वृत्तपत्रे आणि वाहिन्या सर्रास इंग्रजी किंवा हिंदी शब्द असलेले मथळे देतात. यामुळे ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावतो’, अशी गत होते.
१०. शैक्षणिक संस्थांच्या संदर्भातील प्रयत्न !
अ. महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांना काही बंधने घालून शुद्ध मराठी बोलणे भाग पाडले गेले पाहिजे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा मोठा परिणाम होत असतो.
आ. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यक्रमातून पर्यावरणविषयक मोठी जागृती करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची मराठी भाषा म्हणून तिचा अधिकाधिक वापर आणि तिच्यातून संवाद साधण्यासाठी पाठ्यक्रमातूनही प्रयत्न केले जाऊ शकतात.
इ. शैक्षणिक संस्था शिक्षकांना मराठीचा वापर कटाक्षाने करण्यास बंधनकारक करणे, मराठीत चांगले गुण मिळणार्या विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहित करणे, चांगले बोलणार्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन, तसेच कविता, निबंध, पाठांतर स्पर्धा ठेवून प्रोत्साहित करू शकतात. स्नेहसंमेलनात या विषयावरील नाटके बसवू शकतात.
ई. प्रत्येक विषयातील परिभाषा कोशांचा शाळा, तसेच त्या त्या विषयांच्या महाविद्यालये येथे वापर बंधनकारक केला पाहिजे. मराठी आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा बनण्यास यत्किंचितही न्यून पडू नये, इतका वैज्ञानिक, तांत्रिक, संगणकीय, औद्योगिक, व्यवसाय, लेखा, व्यापार, वैद्यकीय आदी सर्वच क्षेत्रांत नवनवीन मराठी शब्दसंपदा निर्माण होण्यासाठी प्रयत्न चालू केले पाहिजेत.
११. मनसेने लक्षात आणून दिलेली उदाहरणे !
अ. सार्वजनिक जीवनात मराठीचा जोरकस आणि सार्वत्रिक वापर परिपूर्णतेने हवा. वर्ष १९९३ मध्ये ‘गाडीवर मराठीत पाटी लावू शकतो’, असा आदेश काढला आहे; पण वाहन पोलिसांना हे ठाऊक नसल्याने दंड आकारतात. उपाहारगृहातही इंग्रजीत देयक दिले जाते. अधिकोष, विमा या क्षेत्रांमध्ये मराठीत शब्द निर्माण होऊन ग्राहक आणि सेवा देणारे दोघांकडून मराठी शब्दांचा वापर झाला पाहिजे.
आ. मराठी भाषांतरकार, दुभाषक, टंकलेखक, अनुवाद मोठ्या प्रमाणात निर्माण होणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील नोकरीच्या संधी युवक-युवतींनी घेतल्या पाहिजेत. शासन या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि मराठीचा सार्वत्रिक वापर असे दोन्ही हेतू साध्य करू शकते.
इ. मराठी वाचक मराठी संकेतस्थळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
१२. अन्य भाषांच्या शैलींच्या प्रभावात मराठी भाषाशैली कृत्रिम व्हायला नको !
सध्या आपण ‘गूगल भाषांतरा’च्या जगात वावरतो. इंग्रजी आणि हिंदी या भाषांचा मराठीवर किती परिणाम झाला आहे, हे आपण पूर्वीच्या लेखांत सोदाहरण पाहिले. आता गूगल भाषांतराचा परिणामही मराठीतील लिखाणावर होत आहे. तो टाळला पाहिजे. मराठीत होऊन गेलेल्या प्रसिद्ध कवयित्री शांता शाळके यांनी इंग्रजीचे मराठीत भाषांतर करतांना मराठी भाषेची शैली पालटली जाऊ नये, या अनुषंगानेच ‘अनुवाद’, ‘भाषांतर’, ‘स्वैर अनुवाद’ अशा प्रकारे वर्गीकरण केले. त्यामुळे भाषेची अंगीभूत शैली अबाधित ठेवण्यास साहाय्य झाले. त्यानुसार काय आवश्यक आहे, ते लक्षात घेऊन भाषांतर झाले पाहिजे. (समाप्त)
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.२.२०२५)
…यासाठी मराठी भाषा हवी !यापूर्वी म्हटल्याप्रमाणे केवळ भाषा मराठी नको, तर आपल्याला ‘मन’ही मराठी हवे आहे. मराठी मन म्हणजे लढाऊवृत्ती आहे. मराठी मन म्हणजे धाडस आहे. मराठी मन म्हणजे संघर्षाची पराकाष्ठा आहे. मराठी मन म्हणजे परमार्थाची कास आहे. मराठी मन म्हणजे अध्यात्माची जाण आहे. त्यामुळे अशा मराठी मनांची भाषा ती ‘मराठी’ आहे. राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान असणारी ती मराठी आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या हातात हात घालून येणारी अस्मिता म्हणजे मराठी आहे. मराठी आहे, तर राष्ट्र आणि धर्म आहे अन् राष्ट्र आणि धर्म आहे, तर मराठी आहे ! म्हणून चला तर परकीचे पद झुगारून पुन्हा एकदा मराठीच्या पुनर्निमितीचे पोवाडे गाण्यास सिद्ध होऊया ! मराठीचे अंतर्गान मनामनात रुजवूया आणि मराठी जनांच्या हृदयी तिचे स्थान अढळ करून विश्वात तिचा नावलौकिक वाढवूया ! – सौ. रूपाली अभय वर्तक |
भाषाभिमानाचे मूळ धर्माभिमानात आहे !स्वातंत्र्यवीर सावरकर स्वकीय शब्दांविषयी इतके आग्रही का राहू शकले ? त्यांच्यामधील प्रखर राष्ट्रभक्ती हेच त्यांच्या प्रखर स्वभाषाभिमानाच्या मागील एक कारणही होते. सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीस त्यांच्यातील प्रखर धर्माभिमानही कारणीभूत होता. यावरून लक्षात येते की, स्वभाषाभिमान असेल, तर भाषा जिवंत राहून ती वृद्धींगत आणि संवर्धित होईल; मात्र प्रखर राष्ट्र अन् धर्माभिमान असेल, तरच प्रखर भाषाभिमान निर्माण होऊ शकतो; कारण भाषेची नाळ शेवटी संस्कृतीशी आणि संस्कृती ही धर्माशी जोडलेली असते ! परकीय भाषेचे आक्रमण जाणले; म्हणून छत्रपती शिवरायांनी राजशकट चालवण्यासाठी स्वभाषेतील कोश सिद्ध करवून घेतला. छत्रपतींमुळे जसे हिंदू आणि हिंदु संस्कृती टिकली, तशी मराठी भाषाही टिकली. प्रखर धर्माभिमान असल्यामुळेच छत्रपतींचा स्वभाषाभिमानही तितकाच होता. सध्याच्या काळात राजा आणि प्रजा या दोघांमध्येही प्रखर धर्माभिमानाची न्यूनता आहे. त्यामुळे जो काही थोडाफार स्वभाषाभिमान दाखवला जातो, तो वरवरचा आणि कित्येकदा पोकळ ठरतो. विद्यापिठाच्या स्तरावर किंवा बौद्धीक स्तरावर काही तज्ञ मंडळी आणि शासन यांच्याकडून स्वभाषेच्या रक्षणासाठी काही प्रयत्न होतात; परंतु ते प्रत्यक्षात येण्यासाठी लागणारा प्रत्येक मराठी माणसामध्येही प्रखर स्वभाषाभिमान रुजणे आवश्यक आहे. – सौ. रूपाली अभय वर्तक |