|
भाग्यनगर (तेलंगाणा) – इस्रायलमध्ये चांगल्या वेतनासाठी गेलेल्या अनुमाने १ सहस्र ५०० भारतीय नागरिकांची दुर्दशा पहायला मिळत आहे. विविध क्षेत्रांत कौशल्य असणार्या भारतियांना मजुरांचे काम करावे लागत आहे. त्यातच मूळ करारानुसार प्रतिमास २०० ते २३६ घंटे काम करण्याचे ठरलेले असतांना प्रत्येकाला तब्बल ३६० घंटे, म्हणजेच प्रतिदिन १२ तास काम करण्याची बळजोरी केली जात आहे.
१. या भारतियांपैकी काही जण सिव्हिल इंजिनिअर (स्थापत्य अभियंता) आहेत. अन्य काही जण बांधकाम तज्ञ, ‘सिरॅमिक टाइल्स’ तज्ञ, ‘फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग’ तज्ञ आदी विविध क्षेत्रांशी संलग्न असलेले आहेत.
२. अनेकांची तक्रार आहे की, कंत्राटानुसार ‘चांगले वेतन मिळाले’, मात्र निवड होतांना सांगितलेले काम मिळाले नाही. यांपैकी बहुतांश जण बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करत आहेत. कुणी वीट-सिमेंट उचलत आहे, तर कुणी घर स्वच्छ करत आहे.
३. ‘इस्रायल-तेलंगाणा असोसिएशन’चे अध्यक्ष सोमा रवि यांनी एका हिंदी वृत्तपत्राला सांगितले की, इस्रायल-हमास युद्धाच्या वेळी इस्रायलला कुशल कामगारांची न्यूनता भासली, म्हणून भारतातून लोक पाठवण्यात आले. डिसेंबर २०२३ पासून असे अनुमाने १० सहस्र भारतीय कुशल कामगार इस्रायलला पाठवण्यात आले आहेत. यांपैकी १ सहस्र ५०० पेक्षा जणांना वेगळेच काम दिले आहे.
४. भारतीय कामगार हे प्रामुख्याने राफाह, लेबनॉन सीमा, अशदोद, हाइफा, तेल अविव, होलोन, जेरूसलेम, नेतन्या या भागांत काम करत आहेत.
५. या प्रकरणी डिसेंबर २०२४ मध्ये केंद्र सरकारने सांगितले होते की, काही कामगारांनी इस्रायलशी संबंधित तक्रारी सरकारी अधिकार्यांना सांगितल्या होत्या. त्या सोडवल्या आहेत. दुसरीकडे कामगारांचे म्हणणे आहे की, तक्रारी मांडूनही सरकारने त्या सोडवलेल्या नाहीत.
संपादकीय भूमिकाभारताने इस्रायली यंत्रणांना यावरून जाब विचारला पाहिजे. तरच तेथील आस्थापने भारतियांचा अपलाभ उठवणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |