‘म. गांधींचा वध करणारे नथुराम गोडसे ज्वलंत राष्ट्रप्रेमी होते. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर देशाचे आणखी तुकडे होऊ नयेत, या हेतूने देशाच्या रक्षणार्थ त्यांनी म. गांधींचा वध केला हाेता. हिंदुस्थानच्या उरलेल्या भागाची अखंडता तरी कायम टिकावी, या हेतूनेच त्यांनी गांधींना मारले’, असे जर कुणी अगदी काल-परवापर्यंत म्हटले असते, तरी समाजाने ते ऐकून घेतले नसते, एवढे गांधीप्रेम समाजात होते. त्यातून मग गांधींना कुणी ‘राष्ट्रपिता’ न म्हणता ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून त्यांचा उल्लेख केला, तरी तो सहन होत नव्हता. ही फार जुनी गोष्ट नाही; पण आता गांधीवधाचे समर्थन करणारे एक नाटकच गुजराती रंगभूमीवर आले होते. नाव होते ‘गांधी के गोडसे’ लेखक-दिग्दर्शक जयसुख रावराणी आणि विपुल भार्गव.
गांधी वधाचा इतिहास नुसता दडपलाच गेलेला नाही, तर त्यात सोयीस्कर गोष्टी घुसडल्या आहेत. स्वतःला ‘निधर्मी’ म्हणवणारा काँग्रेस पक्ष निधर्मी नसून गांधीजींपासूनच मुसलमानधार्जिणा आहे, हेही या नाटकाच्या निमित्ताने जनतेला समजले. गोडसे आणि त्यांचे सहकारी देशद्रोही नव्हते; उलट ‘आपल्या मृत्यूनंतर जोपर्यंत सिंधू नदी भारतात येऊन अखंड हिंदुस्थानचे आपले स्वप्न पूर्ण होत नाही, तोवर आपल्या अस्थींचे विसर्जन करू नये, असे सांगण्याइतकी नथुराम यांची राष्ट्रभक्ती प्रखर आहे’, हेही जनतेला समजेल. काँग्रेस पक्षाची केंद्र आणि महाराष्ट्र येथील सत्ता गेल्यानंतर ‘गांधी के गोडसे’ हे नाटक रंगभूमीवर गुजराती भाषेत आले, हाही एक योगायोगच !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2022/01/31215707/Nathuram_Godse_320.jpg)
१. गांधी वध करण्यामागील नथुराम गोडसे यांची पार्श्वभूमी
फाळणीनंतर पाकिस्तानातून नाईलाजाने हिंदुस्थानात परतावे लागलेल्या मदनलाल पहावाच्या कुटुंबाची वाताहत आणि हिंदूचा झालेला रक्तपात यातून लक्षात येते की, बॅ. जीना आणि ‘मुस्लिम लीग’ यांच्या फाळणीच्या हट्टापुढे तत्कालीन मंत्रीमंडळाने शरणागती पत्करली. त्याला कारणीभूत झाले ते म. गांधी ! ‘फाळणीनंतरही पाकिस्तानातील हिंदूंनी हिंदुस्थानात परत न येता तेथेच रहावे’, असा आदेश देऊन त्यांना येथील तत्कालीन भारत सरकारने मुसलमानांच्या हवाली केले.
म. गांधींनी हिंदुस्थानातील अल्पसंख्यांकांची काळजी घेतली; पण पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाची मात्र मुळीच काळजी केली नाही. त्यामुळे अर्थातच पुढील रक्तपात घडला आणि असंख्य लोकांची कत्तल झाली. स्त्रियांवर बलात्कार झाले. मदनलाल पहावाच्या वडिलांना पाकिस्तानात रहावे लागून त्याला हिंदुस्थानात यावे लागले. वडिलांना तिथे मुसलमानांनी ठार मारले असेल, अशी मदनलाल पहावाची खात्री असून या सगळ्या मानव संहाराला कारणीभूत आहेत ते गांधी. याविषयी त्याची निश्चितीच आहे. (त्यामुळेच गांधी वधाचा निर्णय घेताच नथुराम म्हणाले, ‘मी गांधींना मारणार.’)
‘पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतरही गांधीजींना मुसलमानांविषयी कळवळा आला आणि ते पुन्हा पाकिस्तानला गेले, तर राष्ट्राचे आणखी तुकडे पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांनाच संपवले पाहिजे. देश वाचवण्याचा दुसरा मार्गच शिल्लक नाही’, अशी नथुराम यांची खात्री पटली होती. फाळणी करतांना गांधीजींनी देशातील लोकांच्या भावना कधी विचारातच घेतल्या नाहीत. प्रत्येक वेळी राजकारणात ते स्वतःचाच हट्ट चालवत आले. त्यासाठी उपोषण, मौन असे मार्ग त्यांनी अवलंबले आणि त्यापुढे काँग्रेस नेत्यांनी शरणागती पत्करली. ‘यापुढेही मंत्रीमंडळ असेच त्यांच्या वरवर अहिंसक भासणार्या; पण प्रत्यक्षात दबावाच्या तंत्राखालीच राहील आणि त्यामुळे देशाची हानी होईल’, याविषयी नथुराम यांची पूर्ण खात्रीच झालेली आहे. करकरे, आपटे हे त्याला वारंवार गांधी हत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे परिणाम फार भीषण होतील, हे जाणून ‘दुसरा काहीच मार्ग नाही का ?’, असे विचारत रहातात; पण त्या वेळी देशात सर्वशक्तीमान व्यक्ती एकच आहे आणि ती मनात येईल ते करू शकते, हेही त्यांना दिसत होते. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये (आताचे ५ सहस्र १५ कोटी रुपयांहून अिधक) देण्यासाठी गांधींनी अन्नत्याग केला आणि सरकारने निमूटपणे शरण जाऊन ५५ कोटी रुपये पाकिस्तानला दिले. त्यावरून हेही सिद्ध होत होते की, यापुढे मुसलमान जे जे मागतील, ते ते आपल्या देशाला द्यावे लागेल. देशातही गांधी मुसलमानधार्जिणेपणानेच वागत होते. (आजही काँग्रेसने ते धोरण सोडलेले नाही.) पाकिस्तानातून निर्वासित होऊन परतलेल्या लोकांनी मंदिरे, मशिदी यातून आश्रय घेतला होता; पण ‘मशिदीत त्यांनी रहाता कामा नये’, ही इच्छा मुसलमानांनी व्यक्त करताच गांधींच्या आदेशानुसार हुसकावून लावण्यात आले. या सगळ्या गोष्टींवरून ‘गांधींचा वध करणे, हे क्रौर्य नसून अनिवार्य आहे’, असेच आपल्याला वाटत असल्याचे नथुराम आपल्या सहकार्यांना पटवून देतात.
२. गांधींचा मुसलमानधार्जिणेपणा आणि नथुराम यांनी वधासाठी नेहमीच्या वेषात जाण्याचे ठरवणे
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2022/03/31220958/gandhi-1.jpg)
दिगंबर बडगे जो पुढे माफीचा साक्षीदार होतो, त्याचे आणि परचुरे यांचे साहाय्य घेतले जाते. यांपैकी परचुरेकडून नथुराम यांचे साथीदार पिस्तूल मिळवतात आणि बडगे स्फोटासाठी सामुग्री जमवतो. गांधींचे निवासस्थान असलेल्या ‘बिर्ला हाऊस’मध्ये स्फोट घडवण्याचा प्रयत्न होतो; पण तो कट फसतो आणि त्यात बडगे पकडला जातो. त्याच्याकडून पोलिसांनी माहिती काढून घेण्यापूर्वी गांधी वध होणे आवश्यक असल्याने अत्यंत अल्प वेळात हे काम उरकणे आवश्यक असते;
पण यासाठी गांधींच्या सामुदायिक प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. या चर्चेच्या निमित्ताने पुन्हा एकदा गांधींच्या मुसलमानधार्जिणेपणाचा सूचक उल्लेख येतो. आपटे हे नथुराम यांच्यासाठी एक काळा बुरखा घेऊन येतो आणि म्हणतो, ‘हा बुरखा उपयोगी पडेल; कारण मुसलमान स्त्रियांना प्रार्थनेच्या वेळी अगदी पहिल्या रांगेत बसायची व्यवस्था असते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचायचे कसे, असा प्रश्न पडणार नाही’; पण ते गैरसोयीचे वाटल्याने नथुराम नेहमीच्या वेषातच खिशात पिस्तूल ठेवून जातो.
३. गांधी वधापूर्वी नथुराम यांनी केलेला भविष्यकालीन विचार
नथुराम हे कुणी माथेफिरू नव्हते की, आले मनात आणि चालवले पिस्तूल. अत्यंत योजनाबद्ध रितीने ते कट आखतात. त्यासाठी कोणता मार्ग योग्य आणि हमखास यशाचा ठरेल, या दृष्टीने ते रंगीत तालीमसुद्धा करतात. त्याचसमवेत ‘या वधानंतर आपल्याला फाशी होणार; पण पुढच्या अनेक पिढ्यांना कदाचित राष्ट्रपित्याची हत्या करणारे देशद्रोही म्हणून उपहास सहन करावा लागणार आहे’, याचाही त्यांनी विचार केला होता; पण ‘अखंड भारतवर्ष’ या स्वप्नासाठी, देशासाठी हे सगळे सहन करणारच’, असा त्यांचा निर्धार होता. देशप्रेमापुढे नथुराम यांना स्वतःची प्रतिमा मलीन होण्याची मुळीच काळजी वाटत नाही. त्यामुळे अत्यंत शांतपणे ते वध करतात. त्याच शांतपणे ते फासावरही जातात.
४. गांधी वधानंतर त्या ठिकाणी झालेली परिस्थिती
गांधी वधाच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन करतांना नथुराम म्हणतात, ‘मी पुढे होऊन गांधींना गोळ्या घातल्या. ते कोसळले आणि त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांनी तिथून पळ काढला. माझ्या हातात पिस्तूल, समोर गतप्राण होऊन पडलेले गांधीजी, भोवतालची पळून जाणारी माणसे असे दृश्य होते. त्यांच्या भक्तांपैकी एकानेही पुढे होऊन मला पकडायचा प्रयत्न केला नाही. मला तर मदार्याच्या खेळाची आठवण आली.’
५. गांधी तत्त्वासाठी जगले, मी तत्त्वासाठी मेलो ! – नथुराम गोडसे
‘फाशी’ होणार, हे नक्की असतांना नथुराम यांचे मन जराही विचलित होत नाही. देशहितासाठी आपण हे कृत्य केले, अशी त्यांची ठाम भावना पाहून ज्याने आपल्या कारकीर्दीत ८ जणांना फाशी दिली आहे, असा शेख नावाचा मुसलमान जेलरसुद्धा अचंबित होतो. नथुराम यांची राष्ट्रभक्ती त्यांना विचार करायला प्रवृत्त करते. प्रथमच आपल्याला गांधींविषयीसुद्धा तिरस्कार वाटल्याचे नथुराम मान्य करतात; पण गांधींचा वध करण्याचे ठरल्यापासून किंवा वधानंतरही त्यांच्या तोंडी गांधींविषयी अनादराचा एकही शब्द नाही. त्यांचे मोठेपण त्यांनी मान्य केलेले होते. त्यांचे देशकार्य ते कुठेही न्यून लेखत नाही. त्यांना गोळ्या घालण्यापूर्वी ते वंदनच करतात. पुढे नथुराम म्हणतात, ‘गांधी आणि मी दोघेही तत्त्वासाठी लढलो. ते तत्त्वासाठी जगले, मी तत्त्वासाठी मेलो.’
– सुजाता जोग
साभार : (‘दैनिक सामना’, १२.१०.१९९७)
…व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे ! – नथुराम गोडसे
आणखी एक महत्त्वाचे सूत्र नथुराम मांडतात. ते म्हणजे गांधींना जर खरोखर देशाची अखंडता टिकावी, असे वाटत असते, तर त्यांनी फाळणी होऊ नये; म्हणून उपवास का केला नाही ? त्यांचे धोरण सर्वधर्मसमभावाचे आहे; मग जीना पंतप्रधान झाले; म्हणून कुठे बिघडले ? देश तर अखंड राहिला असता; पण गांधींनी ते केले नाही. आणखी काही काळ ते जिवंत राहिले, तर जुना हैदराबाद ते ढाक्यापर्यंतचा जो पट्टा जीनांना रेल्वेमार्ग नेण्यासाठी हवा आहे तोही जाईल आणि हिंदुस्थानची आणखी शकले (तुकडे) होतील. यासाठी गांधींचा वध हा एकच पर्याय आहे आणि व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. हे पटल्याने अखेर वधाचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने कटाची आखणी केली. – सुजाता जोग
संपादकीय भूमिकासिंधु नदीचे देशात आगमन आणि अखंड हिंदुस्थान या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र हवे ! |