निष्काम कर्माचे फळ अधिक लाभदायक असते !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘ईश्वर नित्य मुक्त आहे. सकाम कर्म केले आणि भगवंताकडे फळ मागितले, तर ते तो अवश्य देतो; पण ते फळ बद्ध करते, अंगलट येते. फळच मागितले नाही, तर फळ देण्याचे ईश्वराचे स्वातंत्र्य कायम रहाते. योग्य वेळी जेव्हा प्रारब्ध अनुकूल असेल, तेव्हा तो फळ देतो. ते अनेक पटींनी फळते. न मागणार्‍यालाच सगळे मिळते. त्यालाच भगवंताची प्रसन्नता आणि कृपाही लाभते. यज्ञकर्मही भगवंताला समर्पण केल्याने या सृष्टीच्या अनंत फापटपसार्‍यात त्याला त्या कर्मफळाने अशी संधी दिलेली असते की, त्याचे कल्याण झालेले असते. भक्त म्हणतो, ‘‘भगवंता, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या इच्छेचे मूल्य शून्य आहे !’’

समर्पण ‘मुक्त’ करते ! आपल्याला आपले हित कुठे कळते ? भगवंतावरच सगळे सोपवले की, आपले कल्याण करायला तो बद्ध असतो. आपले कल्याण होईल, अशी बुद्धी तो देतो.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२२)