संपादकीय : राष्ट्रभक्तांचा आदर्श घ्या !

स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई

गोव्यातील ज्येष्ठ महिला स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई या ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. गोमंतकियांसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट ! गोवा मुक्तीसाठी सत्याग्रही मार्गाने आणि सशस्त्र क्रांती अशा दोन्ही प्रकारे प्रयत्न झाले. यातील कुठला मार्ग योग्य ? याला अर्थ नसून त्यामागील देशासाठी प्राणत्याग करण्याची भावना महत्त्वाची ठरते. एखादा प्रांत परकियांपासून मुक्त करायचा, तर तेथील स्थानिक जनतेच्या मनात त्या परकीय राजवटीच्या विरोधात असंतोष निर्माण करावा लागतो. स्थानिक जनतेची ही मानसिकता निर्माण करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. लिबिया लोबो सरदेसाई आणि त्यांचे साथीदार यांनी नेमके हेच केले. त्यांनी रेडिओ केंद्र चालवून गोमंतकियांमध्ये पोर्तुगिजांच्या विरोधात जागृती करण्याचा प्रयत्न केला. जनतेला रेडिओ केंद्रावर गोव्यातील घडामोडी कळू लागल्या. हे एक महत्त्वाचे कार्य होते; पण ते करणार्‍यांना कोणत्या परिस्थितीत आणि धोका पत्करून करावे लागते, हे स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो यांच्या अनुभवातून नक्कीच शिकायला मिळू शकते.

धाडसी महिला !

महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच लिबिया यांची एम्.एन्. रॉय या जगप्रसिद्ध साम्यवादी क्रांतीकारकाशी झालेली ओळख; मात्र विनाशकारी दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांनी कट्टरपंथी उदारमतवाद सोडण्याचा घेतलेला महत्त्वाचा निर्णय त्यांच्यावरील  मानवतावादाचा वैचारिक प्रभाव दर्शवतो. आकाशवाणी केंद्रात काम करतांना तेथे बाह्य सेवा विभागाद्वारे गोमंतकियांच्या समस्या जगभर मांडणारे वामन सरदेसाई यांच्याशी त्यांची भेट झाली आणि नंतर स्वतंत्र रेडिओ केंद्र चालवतांना ते त्यांच्या कामी आले. भारतीय सैनिकांनी पोर्तुगिजांकडून एक रेडिओ ट्रान्समीटर जप्त केला होता. त्याद्वारे भारतीय सैन्याच्याच योजनेनुसार आंबोली येथे जंगल परिसरात राहून ‘व्हॉईस ऑफ फ्रीडम रेडिओ स्टेशन’च्या माध्यमातून लोबो, सरदेसाई आणि मिनेझिस गोव्यात बातम्या अन् महत्त्वाची माहिती प्रसारित करत. यामुळे गोमंतकियांमध्ये क्रांतीची ज्योत प्रज्वलित होत असे. परिस्थितीनुसार हे ठिकाणही त्यांना काही दिवसांतच सोडून जावे लागल्यावर मिनेझिस यांनी माघार घेतली; पण लिबिया लोबो आणि वामन सरदेसाई यांनी कर्नाटकच्या सीमेवरील कॅसलरॉक येथे जंगल परिसरात राहून हे रेडिओ केंद्र पुढे ६ वर्षे चालू ठेवले. सध्या ‘नारीशक्ती’चा उद्घोष केला जातो; पण लिबिया लोबो यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे चरित्र वाचल्यास खर्‍या ‘नारीशक्ती’चा जनतेला परिचय होईल. सध्या ‘नारीशक्ती’च्या नावाखाली राजकारणात शिरलेल्या महिलांनीही ‘आपण लोबो यांच्याप्रमाणे राज्यासाठी किंवा राष्ट्रासाठी कार्य करू शकलो असतो का ?’, याविषयी आत्मचिंतन करण्यास हरकत नाही.

भारतीयत्व न विसरणे !

भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन विजय’नंतर गोवा पोर्तुगिजांपासून मुक्त झाला, तरी काही पोर्तुगीजधार्जिणे धर्मांतरित ख्रिस्ती ‘पोर्तुगीज पुन्हा येणार’, असा प्रचार करत होते. तशा वावड्या उठवल्या जायच्या कि प्रत्यक्षात त्यांच्याकडून तसे प्रयत्न चालू होते, हा संशोधनाचा विषय ठरेल; पण असे ख्रिस्ती आजही आहेत, जे ‘गोव्यावर स्वातंत्र्य लादले गेले’, ‘भारताने बलपूर्वक गोवा प्रदेश भारताला जोडला’, असा आरोप करून समाजात विष कालवत आहेत. असे असले तरी गोव्याच्या मुक्तीलढ्यात ख्रिस्त्यांचाही बर्‍यापैकी सहभाग होता. मिनेझिस ब्रागांझा,

डॉ. टी.बी. कुन्हा, पीटर आल्वारिस ही त्यांपैकी काही माहितीतील नावे; तर लिबिया लोबो या दुर्लक्षितांपैकी एक ! १९ डिसेंबर १९६१ या दिवशी लिबिया लोबो आणि वामन सरदेसाई हे भारतीय वायूसेनेच्या विमानात चढले, ज्यात रेडिओ अन् लाऊडस्पीकर जोडलेले होते. त्यांनी गोव्यावर उड्डाण केले आणि पत्रके टाकून गोव्याच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. लोबो यांच्यासारखे ख्रिस्ती धर्मांतरित असले, तरी त्यांचे मूळ भारतीयत्व विसरले नव्हते किंवा त्यांनी परकियांना आपले मानले नव्हते, हे दिसून येते. गोमंतकियांची नाळ भारताशी जुळलेली होती आणि त्यामुळेच पोर्तुगिजांच्या उत्तरार्धातील राजवटीत अनेक गोमंतकीय मुंबईत, तसेच महाराष्ट्रातील काही भागांत अन् बेळगाव येथे गेले.

काही दिवसांपूर्वी ‘गोव्याच्या अस्मितेचे आपणच ठेकेदार’ असल्याप्रमाणे काहींनी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावर चिखलफेक करण्याचा तोकडा प्रयत्न केला; पण ‘भाऊसाहेबांना असे पाऊल का उचलावे लागले होते ?’, याचा विचार केला, तर ‘जनमत कौल’ दिन साजरा करून भाऊसाहेबांना हिणवण्याचा प्रकार कुणी करणार नाही. गोवा मुक्तीनंतर धर्मांतराच्या कटू आठवणी ताज्या होत्या. त्यातच पंतप्रधान नेहरूंनी गोव्याला वार्‍यावर सोडले होते. पोर्तुगालहून पोर्तुगिजांच्या गोव्यातील वारसांना पैसा येत होता. गोव्याची पाळेमुळे भारत भूमीचीच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी कुणाचा तरी आधार घेण्याची आणि भावनात्मक एकोपा दाखवण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्राचा भक्तीमार्ग, मराठी संस्कृतीची परंपरा, सांस्कृतिक सामाजिक ऋणानुबंध, देवदैवते, साधू-संत, आर्थिक हितसंबंध या सर्वांची गोव्याशी नाळ जुळलेली होती. याखेरीज हा चिमुकला प्रदेश स्वशक्तीबळावर उभा रहाण्यासाठी तशी अनुकूल स्थितीही नव्हती. आपल्याला खर्‍या अर्थाने भारतात रहायचे, तर आपण त्याचे अविभाज्य घटक आहोत, हे येथील पोर्तुगीजधार्जिण्यांना पटवून देणे आवश्यक होते. भाऊसाहेबांचा हा विचार तत्कालीन परिस्थितीनुसार होता. गोमंतकियांना त्यांच्या मूळ अस्मितेशी जोडायचे होते.

भावी पिढीला आदर्शांचा परिचय द्या !

राणी लक्ष्मीबाई आणि राणी चेन्नम्मा यांसारख्या लढवय्या महिला या त्यांच्या असीम त्यागासाठी सर्वांनाच परिचित आहेत. त्यानंतरही महिलांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग राहिला आहे. गोवा मुक्तीलढ्यातही शारदा सावईकर, लिबिया लोबो, लक्ष्मीबाई पैंगीणकर आदी काही महिलांचा सहभाग होता. या सर्वांच्याच कार्याचा परिचय गोमंतकियांना झाला आहे, असे नाही. या सर्वांचा त्याग, प्राणार्पण करण्याची सिद्धता, त्यांच्यातील सहनशक्ती, असीम साहस या सर्वांचा परिचय आताच्या पिढीला होणे महत्त्वाचे आहे. शालेय पाठ्यपुस्तकांतून या सर्वांचे कार्य मांडणे शक्य नसल्यास १५ ऑगस्टचा ‘स्वातंत्र्यदिन’, २६ जानेवारीचा ‘प्रजासत्ताकदिन’, यांसह गोव्यात १९ डिसेंबरचा ‘गोवा मुक्तीदिन’ आणि १८ जूनचा ‘गोवा क्रांतीदिन’ आदी राष्ट्रीय सणांच्या वेळी तरी आपण भावी पिढीपर्यंत उजेडात न आलेल्या या साहसी क्रांतीकारकांचे कार्य पोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालय यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास भावी पिढी राष्ट्राभिमानी आणि त्यागी बनण्यास साहाय्य होईल. तसे झाल्यासच भारत केवळ महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु होऊ शकतो !

राष्ट्रीय सण औपचारिकता म्हणून साजरे न करता, त्या दिवशी भावी पिढीत राष्ट्राभिमान जागृतीसाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत !