संपादकीय : भ्रष्टाचार्‍यांच्या मुळावर आघात !

कॉंग्रेस

ब्रिटिशांनी वर्ष १९४७ मध्ये भारत भारतियांच्या स्वाधीन  केला आणि ते निघून गेले; मात्र काही गोष्टींत काही भारतीय आजही त्यांची आठवण काढतात, उदा. नियोजन, दूरदृष्टीने राबवलेल्या योजना, प्रकल्प, गुन्हेगारांवर वचक आदी. ब्रिटिशांनी जेव्हा भारत सोडला, त्यापूर्वी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ‘भारत एक देश नसून तो एक लोकसंख्या असणारा भूभाग आहे’, असे विधान केले होते, तसेच ‘भारतातून ब्रिटीश गेल्यानंतर तेथील शासनकर्ते भ्रष्टाचार करतील’, असेही त्यांचे मत होते. त्यांचे भारताविषयीचे निरीक्षण किती योग्य आणि दूरदर्शी होते, अशी गेल्या ७७ वर्षांची भारताची आणि शासनकर्त्यांची स्थिती पहाता लक्षात येते. ब्रिटिशांकडून भारताची सत्ता जनतेकडे आली, तरी ती जनतेसाठी राबवली गेली, असे अजूनही लोकांना वाटत नाही. भारत स्वतंत्र झाला, त्याच काळात चीन, इस्रायल आदी काही देशही स्वतंत्र झाले किंवा त्यांची निर्मिती झाली. आज ते ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी भारत नाही, असे म्हटले जाते. याला कारण भारतावर स्वातंत्र्यानंतर जवळपास ६० वर्षे राज्य करणारा काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाची मक्तेदारी असणारा गांधी परिवार आहे, असेच म्हणता येईल. काँग्रेसच्या नीतीमुळे आज देश अधोगतीकडे चालला आहे.

सध्याच्या भाजप सरकारच्या काळात ते रोखण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला जात आहे, हे नाकारता येत नसले, तरी काँग्रेसने जे बीज रोवले आहे, त्याची मुळे आणि फांद्या प्रचंड प्रमाणात पसरलेल्या असल्याने त्या नष्ट करून तेथे भारतीय संस्कृतीनुसार बीज रोवून ते वाढण्यासाठी अनेक दशके प्रयत्न करावे लागणार आहेत. भारताच्या भावी पिढीकडून ती अपेक्षा करावी लागणार आहे. सध्या तरी काँग्रेसला भारतियांनी बाजूला केले असले, तरी तिच्या कर्माची फळे, म्हणजे दंड तिला मिळालेला नाही. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यातील ‘नॅशनल हेराल्ड’ हे एक हिमनगाचे टोक म्हणता येईल, असे प्रकरण आहे. या प्रकरणात गांधी परिवाराने नॅशनल हेराल्डची २ सहस्र कोटी रुपयांची संपत्ती अवघ्या ५० लाख रुपयांत स्वतःकडे घेतल्याचा आरोप आहे. याविरोधात वर्ष २०१२ मध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. पुढे यावर चौकशी चालू झाली आणि नंतर सोनिया गांधी अन् राहुल गांधी यांच्यावर गुन्हा नोंद झाला. त्यांना न्यायालयाने जामीन दिल्याने ते आज बाहेर आहेत. आता या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र प्रविष्ट केले असून या माता-पुत्रांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले आहेत. इतकेच नाही, तर यांच्याशी संबंधित प्रकरणात सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. आता खटला चालू होणार आहे. यात जर माता-पुत्र दोषी आढळले, तर किमान ३ ते कमाल ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा त्यांना होऊ शकते, असे कायदा सांगतो. जर असे झाले, तर तो इतिहास ठरणार आहे. हा इतिहास यापूर्वी बोफोर्स घोटाळ्यातही झाला असता, असे अनेकांचे म्हणणे आहे. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती, त्यामुळे ते शक्य झाले नाही आणि राजीव गांधी त्यातून वाचले. आता भाजप सरकार आहे. त्यामुळेच हे प्रकरण इथपर्यंत पोचले आहे. ते पुढे अंतिमतेकडे जाईल, यात आज तरी कोणतीही शंका नाही. त्यामुळे जर दोघेही कारागृहात गेले, तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ होण्यास वेळ लागणार नाही. त्यांच्यानंतर जावईही आत गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. यातून बाहेर राहिलेल्या प्रियांका वाड्रा जनतेसमोर कोणत्या तोंडाने जातील, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे काँग्रेसला घरघर लागणार, हे वेगळे सांगायला नको.