शिरंगे गावातील धरणग्रस्त २६ जानेवारीला उपोषण करणार

तिलारी धरणाच्या ३५ वर्षांनंतरही हानीभरपाई न मिळाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर उपोषण करण्याची वेळ !

तिलारी धरण

दोडामार्ग – तिलारी धरण होऊन ३० ते ३५ वर्षे झाली. या धरण प्रकल्पामुळे अनेक जण विस्थापित झाले. यापैकी शिरंगे गावातील धरणग्रस्तांना एवढ्या वर्षांनंतरही हानीभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारीला शिरंगे बोडण ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची चेतावणी धरणग्रस्त अंकुश गवस, बाळकृष्ण गवस आणि विश्वनाथ घाडी यांनी दिली.

शिरंगे गावातील धरणग्रस्तांचे त्या वेळी घाईगडबडीत अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. या वेळी काही ग्रामस्थांची घरे, मांगर (शेतीचे साहित्य ठेवण्यासाठीची खोली), गोठे (गुरे बांधण्याची जागा), झाडे जी पिढ्यान्‌पिढ्या होती, त्यांची हानीभरपाई न देता बलपूर्वक लोकांना स्थलांतरित केले. ‘येथील मोकळ्या भूमीत पुनर्वसन करावे’, या शिरंगे गावातील धरणग्रस्तांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा धरणग्रस्तांचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

प्रकल्पग्रस्तांना उपोषण करण्यास भाग पाडणार्‍या प्रशासनातील उत्तरदायींवर कठोर कारवाई झाली पाहिजे !