कोल्‍हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात ‘सामूहिक आरती’ला प्रारंभ !

मंदिर संस्‍कृतीचे जतन, संवर्धन, मंदिरांच्‍या पावित्र्याचे रक्षण यांसाठी पुढाकार

कोल्‍हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात आरतीसाठी उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठ

कोल्‍हापूर, ५ जानेवारी (वार्ता.) – ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्‍याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषदे’त १ सहस्राहून अधिक मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी घेतला होता. त्‍यानुसार शुक्रवार, ३ जानेवारीला कोल्‍हापूर येथील साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात महाराष्‍ट्र मंदिर महासंघाच्‍या वतीने रात्री ८ वाजता सौ. प्रीती आणि श्री. प्रीतम पवार या दांपत्‍याच्‍या हस्‍ते आरती करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्‍यात आला. श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात ज्‍या वेळेत आरती होते, त्‍याच वेळेत ही आरती करण्‍यात आली. याचसमवेत सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत वाकरे (तालुका करवीर) येथील नृसिंह मंदिर येथेही सामूहिक आरती करण्‍यात आली.

या प्रसंगी महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, करवीर तालुका संयोजक श्री. आप्‍पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, महाराजा प्रतिष्‍ठानचे श्री. निरंजन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्‍वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्‍थापक श्री. सुनील सामंत, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. संदीप सासने, सर्वश्री रामभाऊ मेथे, अनिकेत गुरव, बाबूराव पाटील, विक्रम जरग यांसह विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी, भाविक मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.