भाववृद्धी सत्‍संगात सांगितल्‍याप्रमाणे ‘प्रत्‍येक श्‍वास परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी अर्पण करत आहे’, असा भाववृद्धीचा प्रयोग करतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती

१. साधिकेला ‘स्‍वतःचा श्‍वास, म्‍हणजे श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुमाऊलीचा उच्‍छ्‌वास आहे’, असे जाणवणे आणि तिला श्‍वास घेतांना पुष्‍कळ हलकेपणा अन् अंतरात गारवा जाणवणे

कु. अपाला औंधकर

‘एकदा भाववृद्धी सत्‍संगात ‘आपला प्रत्‍येक श्‍वास प.पू. गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) चरणी अर्पण करूया’, असे सांगितले होते. त्‍यानुसार मी भाववृद्धीचा प्रयोग करायला आरंभ केला. त्‍या वेळी माझे लक्ष श्‍वासावर केंद्रित झाले आणि ‘माझा श्‍वास, म्‍हणजेच श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुमाऊलीचा उच्‍छ्‌वास आहे’, असे मला जाणवले. मला श्‍वास घेतांना हलकेपणा आणि अंतरात गारवा जाणवला.

२. साधिकेच्‍या हृदयाच्‍या ठोक्‍यांमधून तिला ‘गुरुदेव, गुरुदेव’, असा आवाज ऐकू येणे आणि या अनुभूतीतून ‘प.पू. गुरुदेवांना साधिकेचा प्रत्‍येक श्‍वास त्‍यांच्‍या चरणी अर्पण व्‍हावा’, असे अपेक्षित आहे’, असे तिला जाणवणे 

माझा प्रत्‍येक श्‍वास प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी अर्पण होऊ लागला. यानंतर मला माझ्‍या हृदयाच्‍या ठोक्‍यांचा मोठ्याने आवाज ऐकू येऊ लागला. त्‍या ठोक्‍यांमधून ‘गुरुदेव, गुरुदेव’ असा स्‍पष्‍ट आवाज मला ऐकू येत होता. मला सलग २ – ३ मिनिटे असा आवाज ऐकू आला. त्‍या वेळी माझी प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त होत होती. गुरुदेवांनीच मला ही अनुभूती दिली. या अनुभूतीतून ‘प.पू. गुरुदेवांना माझा प्रत्‍येक श्‍वास त्‍यांच्‍या चरणी अर्पण व्‍हावा’, असे अपेक्षित आहे’, हे मला शिकायला मिळाले.

३. प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून प्रत्‍येक श्‍वास नामासहित अर्पण करण्‍याचा प्रयत्न केल्‍यावर प.पू. गुरुदेवांचे सतत स्‍मरण होऊन आनंद जाणवणे

त्‍यानंतर काही वेळाने मी विचार करत होते, ‘माझा प्रत्‍येक श्‍वास प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी कसा समर्पित होईल ?’ त्‍यानंतर मी प.पू. गुरुदेवांना कळकळीने प्रार्थना केली, ‘तुम्‍हाला अपेक्षित असे मला करता येऊ दे.’ त्‍या वेळी प.पू. गुरुदेवांनी मला सुचवले, ‘प्रत्‍येक श्‍वास नामासहित अर्पण कर.’ मी तसे करण्‍याचा प्रयत्न केला. त्‍या वेळी मला प.पू. गुरुदेवांचे सतत स्‍मरण होत होते आणि आनंद जाणवत होता.’

– कु. अपाला आैंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक