१. नामजप करतांना ‘स्वतःचा आत्मा शरिराबाहेर पडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर फूल बनून समर्पित झाला आहे आणि नंतर सहस्त्रार चक्रातून पुन्हा शरिरात आला आहे’, असे दिसणे अन् प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. त्या वेळी मी डोळे मिटले असतांना अकस्मात् मला दिसले, ‘माझ्या शरिरातून माझा आत्मा बाहेर पडत आहे आणि प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी समर्पित होत आहे. माझ्या आत्म्याचा रंग कापरासारखा होता. माझा आत्मा प.पू. गुरुदेवांच्या चरणांवर समर्पित होतांना मला माझ्या देहाचा स्पर्श जाणवला नाही. गुरुदेवांच्या चरणी समर्पित झाल्यावर माझ्या आत्म्याचे फूल बनले आणि ‘हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे’, असे मला वाटले.
काही वेळाने माझा आत्मा दिव्य पिवळ्या प्रकाशमय रुपामध्ये सहस्त्रार चक्रामधून संपूर्ण देहात गेला. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. मला ‘गुरुदेवांना काय सांगू ? कशी व्यक्त होऊ ?’, हे कळतच नव्हते.’
हे दृश्य मला अनुमाने १२ ते १४ सेकंद दिसत होते. त्यानंतर अनेक वेळा माझ्या डोळ्यांसमोर हे दृश्य आले. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
‘मला केवळ प.पू. गुरुदेवांच्या चरणी समर्पित व्हायचे आहे’, हेच माझे ध्येय आहे’, याची मला जाणीव झाली. ही अनुभूती दिल्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला आैंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा.
|